#IPL2021 CSK vs MI : ‘एल क्‍लासिक’ लढत चेन्नईने जिंकली

अबुधाबी – अमिरातीत रविवारपासून सुरू झालेल्या आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सलामीच्या लढतीत चेन्नई सुपरकिंग्जने मुंबई इंडियन्सवर 20 धावांनी विजय मिळवला व एल क्‍लासिक म्हणून संबोधल्या गेलेल्या या लढतीत वर्चस्व राखले. या सामन्यात 88 धावांची खेळी करणारा चेन्नईचा ऋतुराज गायकवाड सामनावीर ठरला.

कर्णधार महेंद्रसिंह धोनीसह प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्यानंतर महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडच्या अफलातून खेळीच्या जोरावर चेन्नईने 20 षटकांत 6 बाद 156 धावा केल्या. ऋतुराजने नाबाद 88 धावा करत संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या फलंदाजांनी निराशा केली.

नियमित कर्णधार रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत कॅरन पोलार्डसह संघातील सर्व भरवशाचे फलंदाज संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. त्यातही धोनीने नेतृत्व करताना घेतलेल्या अचूक निर्णयांमुळे मुंबईला हे दीडशतकी आव्हानही पर्वताएवढे वाटले. मुंबईकडून सौरभ तिवारीने नाबाद 50 धावांची खेळी केली, पण त्याचे प्रयत्न अपुरे पडले. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत 12 गुणांसह पहिले स्थान मिळवले आहे.

मुंबईकडून या सामन्याद्वारे पदार्पण केलेल्या अनमोलप्रीत सिंग आणि क्वांटन डीकॉक यांनी निराशा केली. दीपक चहरने डीकॉकने 17 धावांवर बाद केले. त्यानंतर चहरने अनमोलप्रीतलाही बाद केले. अनमोलने 16 धावा केल्या. सूर्यकुमार यादव, इशान किशन, बदली कर्णधार कॅरन पोलार्ड आणि कृणाल पंड्या यांनी साफ निराशा केली. दुसऱ्या बाजूने तिवारीने 5 चौकारांसह नाबाद 50 धावांची खेळी केली मात्र, संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. चेन्नईचा अनुभवी गोलंदाज ड्‌वेन ब्राव्होने 25 धावांत 3 बळी घेत मुंबईच्या अन्य फलंदाजांवर वर्चस्व राखले. चहरने 2 बळी घेत ब्राव्होला सुरेख साथ दिली.

त्यापूर्वी,चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना प्रमुख फलंदाजांनी निराशा केली. फाफ डुप्लेसी आणि ऋतुराज गायकवाड यांनी डावाची सुरुवात केली. मुंबई इंडियन्सच्या ट्रेंट बोल्ट आणि ऍडम मिल्ने यांनी पहिल्या पॉवरप्लेमध्ये चेन्नईची अवस्था 4 बाद 24 अशी केली. डूप्लेसी, मोईन अली, सुरेश रैना आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनी लवकर बाद झाले. त्यानंतर मात्र, ऋतुराजने रवींद्र जडेजा याच्या साथीत चेन्नईचा डाव सावरला. ऋतुराजने मुंबईच्या सर्वच गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. जसप्रीत बुमराहने जडेजाला बाद करत ही जोडी फोडली. ऋतुराज व जडेजा यांनी 81 धावांची भागीदारी केली. त्यानंतर जडेजा 26 धावांवर परतला. त्यानंतर ड्‌वेन ब्राव्होने 7 चेंडूत 3 षटकारांसह 23 धावांची खेळी करत संघाला दीडशतकी धावांची मजल मारून दिली. ऋतुराजने 9 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 88 धावा फटकावताना चेन्नईला 20 षटकात 6 बाद 156 धावा अशी धावसंख्या गाठून दिली.

संक्षिप्त धावफलक

चेन्नई सुपर किंग्ज – 20 षटकांत 6 बाद 156 धावा. (रवींद्र जडेजा 26, ड्‌वेन ब्राव्हो 23, ऋतुराज गायकवाड नाबाद 88, अडम मिल्ने 2-21, जसप्रीत बुमराह 2-33, ट्रेंट बोल्ट 2-35). मुंबई इंडियन्स – 20 षटकांत 8 बाद 136 धावा. (सौरभ तिवारी नाबाद 50, अनमोलप्रीत सिंग 16, कॅरन पोलार्ड 15, अडम मिल्ने 15, ड्‌वेन ब्राव्हो 3-25, दीपक चहर 2-19).

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.