पुणे : भरधाव मोटार उलटून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर घडली.- अथर्व भाऊसाहेब जगताप (वय २२, रा. हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या मोटारचालक तरुणाचे नाव आहे.
याबाबत पोलीस हवालदार आदेश संदेश कदम यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मोटारचालक अथर्व मध्यरात्री एकच्या सुमारास बाह्यवळण मार्गावरून निघाला होता.
पाषाणमधील सुतारवाडी परिसरात भरधाव मोटार उलटली. मोटारचालक अथर्व गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.