भुवनेश्वर – लग्नामध्ये दीड कोटी रुपये हुंडा देऊनही अधिकाधिक पैशांची मागणी करत सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्याची तक्रार विवाहितेने पोलिसांत दाखल केली. यावरून बिजू जनता दलाच्या खासदाराविरोधात हुंडा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोपाळच्या महादेव परिसरात राहणाऱ्या साक्षी (वय-34) यांचे 2016 मध्ये बिजू जनता दलाचे खासदार महताब यांचा मुलगा लोकरंजन यांच्याशी विवाह झाला होता. त्यावेळी हुंडा म्हणून दीड कोटी रुपये देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही अधिकाधिक पैशांची मागणी करत शारिरीक, मानसिक छळ करण्यात येत आहे. यासंदर्भात साक्षी यांनी बुधवारी भोपाळच्या महिला पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी खासदार महताब, त्यांची पत्नी महाश्वेता आणि मुलगा लोकरंजन यांच्या विरोधात हुंडा प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
लग्नात माझ्या कुटुंबियांनी खूप खर्च केला होता. आता हुंड्यासाठी सासरचे लोक माझा छळ करत आहेत. लग्नात दीड कोटी रुपये देऊनही अधिकाधिक पैशांची मागणी केली जात आहे, असे साक्षी यांनी तक्रारीत म्हंटले आहे.