नवी दिल्ली – देशात करोनाची दुसरी लाट उदभवली असतानाच उत्तराखंडमध्ये कुंभमेळा पार पडला होता व त्यावर प्रचंड टीकाही झाली होती. आता त्याबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली होती की, हरिद्धारमध्ये कुंभमेळ्या दरम्यान करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी चार लाख चाचणी अहवाल बनावट असल्याचा संशय उत्तराखंड आरोग्य विभागाने व्यक्त केला होता.
यानंतर करण्यात आलेल्या तपासात एकूण एक लाख चाचणी अहवाल बनावट असून खासगी एजन्सीच्या सहाय्याने तयार करण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली होती.
या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर करोनाच्या बनावट चाचण्या करण्यात आल्याचे आरोप झाल्यानंतर शुक्रवारी ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकारामध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात दिल्ली, उत्तराखंड, हरयाणा आणि उत्तर प्रदेशमधील अनेक प्रयोगशाळांमध्ये छापे टाकले. या छाप्यांमध्ये धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
हरिद्वार, डेहराडून, नोएडा आणि हिसार या चारही राज्यांमधील पॅथोलॉजी लॅब्जवर ईडीनं छापे टाकले गेले. संबंधित छापेमारीबाबत ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “ चाचण्या केलेल्या नोंदवहीमध्ये पत्ते आणि नावे देखील काल्पनिक आहेत. तर एकाच घरातील अनेक लोकांकडून नमूने घेण्यात आल्याची बोगसच माहिती दिली गेली आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, काही जणांनी खोटे फोन नंबरही दिले आहेत.
ते पुढे म्हणाले, या छापेमारीत अशी माहिती समोर आली आहे की, ‘बनावट चाचणी अहवालमध्ये फार मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा झाला आहे. हरिद्वार, डेहराडून, नोएडा आणि हिसार या चारही राज्यांमधील प्रयोगशाळांना केंद्र सरकारने कुंभमेळ्यादरम्यान रॅपिड अँटिजेन टेस्ट आणि आरटीपीसीआर टेस्ट करण्याचं कंत्राट दिलं होत. मात्र या कंत्राट प्रयोग शाळांनी कमी करोना चाचण्या केल्या तसेच यात चाचण्या केल्याच्या खोट्या नोंदी केल्या आहेत. या चाचण्यांचे खोटे बिलं देखली तयार केले. त्यातुन आर्थिक फायदा करून घेण्याचा त्यांचा हेतू होता.’
दरम्यान, उत्तराखंडला कुंभदरम्यान चाचण्या करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्य सरकारने एकूण आठ एजन्सींना नमुने गोळा करण्याची जबाबदारी दिली होती. यावेळी नऊ एजन्सी आणि खासगी प्रयोगशाळांनी मिळून एकूण चार लाख चाचण्या केल्या. यामध्ये अँटिजन टेस्ट सर्वाधिक होत्या. याशिवाय राज्य सरकारच्या वतीनेही सरकारी प्रयोगशाळेत चाचण्या करण्यात आल्या.