पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने दि. 10 ऑक्टोबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यात येणार आहे. यासाठी चार दिवसांत 16 हजार 800 उमेदवारांनी अर्ज नोंदणी केली आहे.
राज्यातील अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांच्या नियुक्त्यांसाठी “टीईटी’ परीक्षा उत्तीर्ण होण्याचे बंधन घातलेले आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे “टीईटी’ ची परीक्षा सतत लांबणीवर टाकण्यात आली होती. अखेर आता शासनाने ही परीक्षा घेण्यास परवानगी दिली असल्याने ऑक्टोबरमध्ये परीक्षा घेण्याचे नियाजन करण्यात आले आहे.
परिषदेच्या संकेतस्थळावर “टीईटी’ अर्ज नोंदणी करण्यासाठी 3 ऑगस्टपासून ऑनलाइन सुविधा उपलब्ध झालेली आहे. अर्ज भरण्यासाठी 25 ऑगस्टपर्यंत संधी आहे. त्यानंतर 25 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेता येणार आहेत. येत्या 10 ऑक्टोबर रोजी “टीईटी’चा पेपर क्रमांक 1 हा सकाळी 10.30 ते दुपारी 1 व पेपर क्रमांक 2 हा दुपारी 2 ते 4.30 या वेळेत होणार आहे. दरम्यान, आता “टीईटी’ला उमेदवारांची मोठ्या प्रमाणात नोंदणी होण्याची अधिक शक्यता आहे. आता दररोज दोन ते अडीच हजार उमेदवारांची अर्ज नोंदणी होत असून, त्यात आता वाढ होऊ लागली आहे. शेवटच्या टप्प्यात अर्ज भरणाऱ्यांची संख्या जलद गतीने निश्चितपणे वाढणार असल्याची माहिती परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली आहे.