नवी दिल्ली – राष्ट्रपती रामनाथ कोविंद व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतातील आजी-माजी क्रीडापटू, सेलेब्रिटी यांनी भारताच्या महिला हॉकी संघावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करत महिला संघाने प्रथमच ऑलिम्पिक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठल्यानंतर जगभरातून शुभेच्छा येत आहेत. तुम्ही देशाची शान आहात, आता पदक घेऊनच मायदेशी या, अशा शब्दांत राष्ट्रपती कोविंद यांनी संघाचे कौतुक केले आहे, तर देशाला राष्ट्रीय खेळात गतवैभव परत मिळवून तुम्ही यशस्वी व्हाल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.
भारतीय महिला संघाने तीन वेळा विश्वविजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करत यंदाच्या स्पर्धेत पदकाची आशा निर्माण केली आहे. या विजयानंतर सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस पडत आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, महान हॉकीपटू धनराज पिल्ले, टेनिसस्टार सानिया मिर्झा, टोकियो ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू यांनीही महिला हॉकी संघाचे अभिनंदन करताना पदक जिंकून या अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
विशेष म्हणजे भारत सरकारच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरूनही हॉकी संघाचे अभिनंदन करणारे मीम शेअर करण्यात आले आहेत. हे मीम पार्टनर या हिंदी चित्रपटातील असून, त्यात प्रसिद्ध अभिनेता सलमान खान व गोविंदाही दिसत आहेत. महान अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासह हिंदीसह देशातील अनेक कलाकारांनीही संघाला सुवर्णपदकासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पुनरागमन सोपे नव्हते – राणी
भारतीय महिला संघाची कर्णधार राणी रामपाल हिने गोलकीपर सविता पुनियासह सर्वच खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. या सामन्यातील विजयासह प्रथमच ऑलिम्पिक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली याचा आनंद आहेच, पण त्यामागे खेळाडूंनी घेतलेली प्रचंड मेहनतही आहे. पहिले तीनही सामने गमावल्यावर स्पर्धेत पुनरागमन करणे सोपे नव्हते. मात्र, याच पराभवातून धडा घेत आम्ही विजयात सातत्य राखले. हॉलंड, जर्मनी व ग्रेट ब्रिटन यांच्याकडून पराभूत झाल्यावर खेळाडू पेटून उठले व त्यांनीच हा चमत्कार घडवला आहे, अशा शब्दांत राणीने आपले मत व्यक्त केले आहे.