मुंबई : देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. मात्र आता कोरोनाची नवीन रूपे दिसू लागली आहेत. या नव्या रूपांमुळे देशात महामारीची परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे, परंतु डेल्टा आणि डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरातील लोकांच्या जीविताला अधिक धोका उद्भवला आहे.
यातच अमेरिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालात धक्कादायकबाब पुढे आली आहे. भारतात आढळलेला डेल्टा विषाणू हा मानवांमध्ये गंभीर आजार निर्माण करत असल्याची माहिती समोर आली आहे. कांजण्यांच्या विषाणूप्रमाणे डेल्टाचा संसर्ग पसरत असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. चिंतादायक बाब म्हणजे कोरोना लसीकरण झालेले आणि एकही लस न घेतलेल्या दोन्ही गटाकडून या विषाणूचा प्रसार केला जाऊ शकतो, असं सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन अर्थातच सीडीसीने आपल्या अहवालात म्हटलं आहे.
दरम्यान, डेल्टाची लक्षणे मूळ कोविड -19 विषाणूच्या लक्षणांपेक्षा भिन्न असू शकतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते, एक विषाणू स्वतःच आपली रूपे बनवितो. डब्ल्यूएचओचे आपत्कालीन संचालक मायकेल रायन यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे की, “डेल्टा एक धोक्याचा इशारा आहे. हा एक इशारा आहे की हा व्हायरस पसरत आहे, पण याचे अधिक धोकादायक रूप समोर येण्यापूर्वी आपल्याला समजून घ्यावा लागेल असे त्यांनी म्हटलं आहे.