पूरग्रस्त दौऱ्यात माजी मुख्यमंत्र्यांशी सलगी

शिवसेनेच्या गौरव नायकवडी यांच्या भूमिकेची वाळवा तालुक्यात चर्चा ..!

इस्लामपूर (विनोद मोहिते) : विधानसभेच्या निवडणुकीत इस्लामपूर मतदारसंघातून शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवलेले गौरव नायकवडी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात पुढे-पुढे करताना दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना पुरग्रस्तांबाबत मुख्यमंत्र्यांशी संवाद किंवा पाठपुरावा करण्याऐवजी भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांशी सलगी केल्याने ते सध्या कोणत्या पक्षात ? अशी चर्चा मतदारसंघात रंगू लागली आहे.

हुतात्मा संकुलाचे युवा नेते गौरव नायकवडी हे क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांचे नातू. त्यांनी दीड वर्षांपुर्वी हाती शिवबंधन बांधले. इस्लामपूर विधानसभा शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढवली. बलाढय राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. पराभवानंतर ते तालुक्यात कोठेही सार्वजनिक उपक्रमात कमीचं दिसले. शिवसेनेच्या विविध अभियानात किंवा कार्यक्रमात कधीही आलेचं नाहीत.

शिवसेना पक्षात त्यांना करमत नसल्याचे स्पष्ट होत आहे. पक्षापासून हातभर अंतर राखून ते कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. सध्या महापूर ओसरल्यावर अनेक नेते मंडळी पूरग्रस्त भागाला भेट देत आहेत. वाळवा येथे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला. तेव्हा युवा नेते कोठेही फिरकलेच नाहीत.

विद्यमान शिवसेनेच्या खासदारांचे कट्टर प्रतिस्पर्धी माजी खासदार राजू शेट्टी याना चहापाणी करण्यात त्यांनी धन्यता मानली. शेट्टी साहेब; तुम्हाला आम्हीच आहोत असा आशावादही द्यायला ते विसरले नाहीत.

तालुक्यात कृष्णा आणि वारणा नदीच्या काठावरील गावांत पूरस्थिती नंतर पूरग्रस्तांचे प्रश्न गंभीर आहेत. स्वतः पुरस्थितीची व्यथा शिवसेनेच्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे न मांडता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाळवा दौरा दरम्यान फडणवीस यांच्या मांडीला-मांडी लावून शिवसेनेला घरचा आहेरच दिल्याची चर्चा वाळवा तालुक्यात आहे.

हुतात्मा संकुलाच्या कार्यक्षेत्रातील वाळवा व शिरगाव ही गावे सोडली गौरव नायकवडी मतदारसंघातील कोणत्याही गावांच्या मदतीसाठी पुढे दिसले नाहीत.त्यामुळे निवडणूकीसाठी इस्लामपूर मतदारसंघ व निवडणूकीनंतर ” हुतात्मा संकुल ” असा कित्ता त्यांनी पुन्हा गिरवला आहे.

विधानसभा निवडणूकीनंतर राज्यात सर्वत्र भाजप व शिवसेनेत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. मात्र शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवलेल्या गौरव नायकवडी यांनी वाळवा तालुक्यातील भाजपच्या नेत्यांबरोबर उठबस कायमची ठेवली आहे.

गेल्या दिड- दोन वर्षात गौरव नायकवडी यांनी शिवसेनेसाठी किती संघटन केले ? किती बैठका घेतल्या ?मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत म्हणून मतदार संघासाठी किती निधी आणला ? जनसंपर्क ठेवण्यावर किती भर दिला ? यांची उत्तरे मतदारसंघातील सुज्ञ जनतेला माहीत आहेत. याची उत्तरे शोधल्यावर “ते ” शिवसेनेत जास्त रमलेले दिसतच नाहीत.

पण शिवसेनेत प्रवेश केलेल्या गौरव नायकवडी यांची भाजपशी असणारी सलगी चर्चेचा विषय ठरत आहे . वाळवा तालुक्यात मंत्री जयंत पाटील यांचा परंपरागत विरोधी गट म्हणून हुतात्मा संकुलाकडे पाहिले जाते. तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था , विधानसभा व लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी विरोधी विकास आघाडीत हुतात्मा गट कार्यरत आहे. तरीही कोणत्याही पक्षात प्रवेश न करता आपला वेगळा गट हुतात्माने टिकवून ठेवला होता.

गत विधानसभा निवडणूकीत इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सुटला. हुतात्मा गटाचे गौरव नायकवडी यांनी अखेरच्या क्षणाला शिवबंधन बांधले आणि विधानसभा निवडणूक लढवली . निवडणूकीत ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते.

स्व:पक्षापेक्षा विरोधी पक्ष बरा….!

विरोधी पक्षनेत्यांचा दौरा वाळवा येथे असल्याचा निरोप भाजपा नेत्याकडे आला. पुरग्रस्तांच्या भेटीचे नियोजन सुरु झाले. रंगीत तालीम झाल्याची कुणकुण लागताच युवा नेते गौरव नायकवडी यांनी भाजपा नेत्याशी संपर्क करत ग्रामपंचायतीला भेट देणेबाबत हट्ट धरल्याची चर्चा आहे.

भाजपाने हट्ट पुरवला सर्वप्रथम गौरव नायकवडीच्या विनंतीला मान देत दौऱ्याची सुरुवात ग्रामपंचायत कार्यालयातून केली. तेथे पुरग्रस्तांची व्यथा विरोधीपक्ष नेते फडणवीस यांच्याकडे मांडली. आणि शिवसेनेत काय राम नाही असेच जणू स्पष्ट केले. येवढ्यावरच न थांबता त्यांनी फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावत पुरस्थीतीचा दौरा करत नागरीकांच्या व्यथा मांडल्या. शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना गौरव नायकवडी यांनी विरोधीपक्ष नेते फडणवीस यांच्याकडे व्यथा मांडत शिवसैनिकांना नेमका कोणता संदेश दिला याची चर्चा तालुकाभर आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.