भाजप पदाधिकाऱ्यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयास भेट
पुणे – भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहर पदाधिकाऱ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आरोप-प्रत्यारोप आणि टीकेच्या फैरी झडत आहेत. सोशल मीडिया तसेच अन्य माध्यमांतून दोन्ही पक्षांचे पदाधिकारी एकमेकांचा “समाचार’ घेत आहेत. मात्र, हे राजकीय वैर बाजूला ठेवत भाजप आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नवीन कार्यालयात “पाहुणचार’ घेतला.
पक्ष कार्यालय पाहणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले होते. गाजावाजा न करता या भेटी झाल्या. यावेळी राष्ट्रवादीकडून शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, तर भाजपचे खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह शहर कार्यकारीणीचे सदस्य उपस्थित होते. राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतील मित्र पक्षांआधी भाजपला भेटीचे निमंत्रण दिल्याने, तसेच आघाडीत वारंवार स्वबळाची भाषा होत असल्याने या भेटीगाठीने राजकीय चर्चा रंगल्या आहेत.
“त्यांनी’ वैर का ठेवयाचे?
कितीही आरोप-प्रत्यारोप झाले-कार्यकर्ते भिडले, तरी राजकरणात काहीही होऊ शकते, याचा प्रतत्य या भेटीने पुन्हा आला आहे. आपले नेते कितीही भांडले तरी एकत्र येतात, मग कार्यकर्त्यांनी एकमेकांशी का वैर ठेवयाचे? हा विचार करण्याची वेळ आहे.