पुणे – सीईओपी मैदानावरील जम्बो कोविड हॉस्पिटल शुक्रवारी बंद करण्यात आले. येथे उपचार सुरू असलेल्या अखेरच्या रुग्णाचा पहाटे मृत्यू झाला. बीड येथील या आजोबांना जीवदान देण्यासाठी डॉक्टरांची फौज तैनात होती. त्यामुळे रुग्णालय बंद करताना अखेरचा रुग्ण ठणठणीत बरा करता न आल्याने येथील स्टाफला रुखरुख लागली आहे.
जम्बो कोविड हॉस्पिटल येथे आतापर्यंत 3,009 जणांवर उपचार करण्यात आले. हे रुणालय 30 जूनपासून पालिकेने बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, येथील शेवटचा रुग्ण गंभीर स्थितीत होता. या रुग्णास इतरत्र नेणे जीवावर बेतणारे होते. त्यामुळे महापालिकेने या एका रुग्णासाठी 700 बेडचे हॉस्पिटल सुरूच ठेवण्यात आले. या रुग्णासाठी डॉक्टरांचे पथक तैनात होते.
स्ट्रक्चरल ऑडिट करणार
करोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने या रुग्णालयाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना संबधित कंपनीस दिल्या आहेत. त्यानंतर हे हॉस्पिटल ठेवायचे की काढायचे? याचा निर्णय घेतला जाणार आहे, असे मनपा अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी स्पष्ट केले.