छोट्या पडद्यावर जे काही टॅलेंट शो असतात ज्यांना ते रिऍलिटी शोजसुद्धा म्हणतात, त्यात रिऍलिटी सोडून इतर नाटकी आणि ढोंगीपणाच जास्त असतो का, अशी शंका दिवसेंदिवस गडद होऊ लागली आहे.
काही दिवसांपूर्वी स्वर्गीय किशोरकुमार यांचे पुत्र अमितकुमार यांनी इंडियन आयडॉलवर जाहीर तोफ डागली होती. नंतर त्यांच्याकडून सगळीकडून हल्लाबोल झाल्यावर ते बिचारे गप्प बसले. मात्र त्यांनी या सर्कशीचे बिंग फोडलेले दिसते आहे.
त्याचे कारण इंडियन आयडॉल 12 च्या दोन कथित जजना आता सर्रास ट्रोल केले जाऊ लागले आहे. नेहा कक्कड, हिमेश रेशमिया आणि विशाल दादलानी यांच्या विरोधात मोहीमच उघडण्यात आली की काय असे वाटावे अशी परिस्थिती आहे.
या शोमध्ये एक पॅटर्न ठरला आहे. स्पर्धक त्याच्या असलेल्या किंवा नसलेल्या गरिबीचे रसभरीत वर्णन स्टेजवर करतो. त्याची आई किंवा वडील किती गरीब आहेत तेही दाखवले जाते. त्यांचे तुटके फुटके घरही झळकते.
मग जज लोक डोळ्यांतून घळाघळा पाणी काढतात. त्यामुळे यांचा टीआरपी वाढतो. गरीब माणूस कलाकार होउ शकत नाही असे नाही. किंवा कलाकारी ही काही श्रीमंतांचीच मक्तेदारी नाही. मात्र, या असल्या कार्यक्रमात गरिबीचा बाजारच मांडला जाऊ लागला आहे. असेच रडतानाचे विशाल, नेहा आणि हिमेशचे फोटो व्हायरल झाले आहे व त्यांच्या या अतिरंजित अभिनयाबद्दल त्यांना ट्रोल करण्यात आले आहे.