पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांच्या प्रवेश प्रकियतेही अडथळा आला आहे. प्रतीक्षा यादीतील 14 हजार विद्यार्थ्यांचा प्राधान्य क्रम तांत्रिक अडचणीमुळे बदलण्यात आले आहे.
“आरटीई’साठी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात राज्यस्तरीय ऑनलाइन लॉटरी काढण्यात आली. पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना 15 एप्रिलपासून प्रवेशाचे “एसएमएस’ पाठवण्यात आले. “आरटीई’ प्रवेशासाठी 9 हजार 432 शाळांनी नोंदणी केली होती. त्यात 96 हजार 684 प्रवेश जागा आहेत. यासाठी 2 लाख 22 हजार 584 पालकांनी ऑनलाइन अर्ज केले. त्यातील 82 हजार 129 बालकांना लॉटरी लागली आहे. काही बालकांना प्रतीक्षा यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.
पालकांनी फक्त “एसएमएस’ वर अवलंबून राहू नये. पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घेण्याकरिता “आरटीई’ पोर्टलवर प्रवेशाची तारीख या ठिकाणी अर्ज क्रमांक टाकून, अर्जाची स्थिती किंवा प्रवेशाचा दिनांक पाहावा. प्रवेश घेण्याची तारीख पोर्टलवर दाखविली जाईल. त्या मुदतीतच पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत.
लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतरच प्रवेश प्रक्रियेचे पुढील वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यात आता दि.1 मे ते 13 जूनदरम्यान शाळांना उन्हाळी सुट्टी आहे.
दरम्यान, “आरटीई’ प्रवेशासाठी प्रतीक्षा यादीही जाहीर करण्यात आली आहे. यात काही तांत्रिक कारणामुळे 400 शाळांमधील प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचा प्राधान्य क्रम बदलला गेला होता. तो तत्काळ दुरुस्त करण्यात आला आहे. सूचना प्राप्त झाल्यानंतरच प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांनी दिली.