योग्य उपचाराने रुग्ण बरे होतात ः तज्ज्ञांचा सल्ला
पिंपरी – ब्लॅक फंगस (म्युकरमायकोसिस) संसर्गाच्या तुलनेत व्हाइट फंगसचे (पांढरी बुरशी) संक्रमण जास्त धोकादायक आहे. त्यामुळे फुफ्फुसांवर तसेच शरीराच्या इतर भागावर नखे, त्वचा, पोट, मूत्रपिंड, मेंदू आणि तोंडावर परिणाम होत आहे. तथापि, उपचाराने हे रुग्ण बरे होत असल्याने घाबरून जाण्याचे कारण नाही, असे मत तज्ज्ञ डॉक्टर व्यक्त करीत आहेत.
पाटणा (बिहार) येथे व्हाइट फंगसचे काही रुग्ण आढळले आहेत. शहरामध्ये सध्या म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळत आहेत. या आजाराने आतापर्यंत 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्या पाठोपाठ व्हाइट फंगसचे रुग्णही आढळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याबाबत पुरेशी दक्षता घेणे गरजेचे आहे. ब्लॅक फंगसमुळे फुफ्फुस संक्रमित होते. संक्रमित रूग्णावर एचआरसीटीसी केल्यावर ते कोविड पॉझिटिव्ह आढळत नाही. परंतु त्यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाल्याचे आढळते.
ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत आहे, त्यांच्यासाठी ब्लॅक फंगसप्रमाणेच व्हाइट फंगस देखील अधिक धोकादायक आहे. मधुमेही रूग्ण आणि जे दीर्घ कालावधीसाठी स्टिरॉइड्स घेत आहेत त्यांना व्हाइट फंगसचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. करोना होऊन गेलेल्या रुग्णांना व्हाइट फंगस होत असल्याचे आढळले आहे. पांढऱ्या फंगसचा थेट परिणाम रुग्णांच्या फुफ्फुसांवर होतो.
करोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांना सध्या फंगस इन्फेक्शन आढळत आहे. सर्दी, डोळे लाल होणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. ब्लॅक फंगसप्रमाणेच व्हाइट फंगस देखील योग्य औषधोपचाराने बरा होतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही.
– डॉ. मिलिंद पटवेकर, त्वचारोग तज्ज्ञ
पूर्वी फंगस इन्फेक्शन हे मधूमेही रुग्ण आणि एड्सबाधित रुग्णांपुरते मर्यादित होते. मात्र, सध्या करोना होऊन गेलेल्या रुग्णांनाही फंगस इन्फेक्शन आढळत आहे. रोगप्रतिकार शक्ती कमी झालेले रुग्ण, गर्भवती महिला आणि लहान मुलांना या आजाराचा धोका जास्त आहे. पाटणामध्ये व्हाइट फंगसचे रुग्ण आढळले आहेत. या आजाराची बाधा होऊ नये, यासाठी आरोग्यदायी जीवनशैलीचा अंगीकार करणे आवश्यक आहे.
– डॉ. सत्यजित पाटील, फॅमिली फिजिशियन व “निमा’ अध्यक्ष.