नंदूरबार – नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी करोना रुग्णांवर उपचारांसाठी सीएसआर फंडातून सरकारला 1 हजार रेमडेसिविर इंजेक्शन मोफत मिळाली होती. परंतु, नंदूरबारचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या खासगी संस्थेला हे सर्व इंजेक्शन्स विक्रीसाठी दिली, असा आरोप भारतीय जनता पार्टीच्या खासदार हिना गावित यांनी केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
खासदार हिना गावित यांनी ऑनलाइन पत्रकार परिषद घेऊन हा धक्कादायक आरोप केला. कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या नंदूरबारच्या नगराध्यक्ष रत्ना चंद्रकांत रघुवंशी यांनी 6 एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून रोटरी वेलनेस सेंटर या खासगी संस्थेसाठी 1 हजार रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी केली होती.
रोटरी वेलनेस सेंटर ही संस्था शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याशी संबंधित आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी पत्र मिळाल्याच्या दिवशीच 6 एप्रिल रोजीच रोटरी वेलनेस सेंटर अँड मेडिसीन यांना शासकीय दरात 1 हजार रेमडेसिविर उपलब्ध करून द्यावेत, असा लेखी आदेश नंदूरबारच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना दिला.
विशेष म्हणजे अशी इंजेक्शन मिळण्यासाठी रोटरी वेलनेसकडून नंदूरबारच्या जिल्हा रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकाऱ्यांना 5 लाख 94 हजार 500 रुपयांचा चेक 6 एप्रिल रोजीच मिळाल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात नमूद केले आहे, असे गावित म्हणाल्या.