रोम : इटलीतील एका रुग्णालयात काम करणाऱ्या व्यक्तीला कामावर दांडी मारणाऱ्या लोकांचा बादशहा म्हणून ओळखले जाते. गेल्या 15 वर्षांच्या कालावधीमध्ये कोणताही अर्ज न करता किंवा कामावर गैरहजर राहण्याची कोणती प्रक्रिया पूर्ण न करता त्याने एकही दिवस काम न करता कोट्यावधी रुपयाचे वेतन मात्र वसूल केले आहे.
गेली 15 वर्ष ही व्यक्ती कामावर येत नसतानाही दरमहा त्याच्या खात्यात वेतन मात्र जमा होत होते. या व्यक्तीने सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये सर्वात जास्त रजा घेण्याचे आणि संपूर्ण वेतन घेण्याचे रेकॉर्ड स्वतःच्या नावावर नोंदवले आहे. या दांडी बहाद्दरला गेल्या 15 वर्षांच्या कालावधीमध्ये 5 लाख 38 हजार युरो म्हणजेच सुमारे 4 कोटी 80 लाख रुपये वेतन मिळाले आहे.
जेव्हा 15 वर्षानंतर ही गोष्ट उघडकीस आली तेव्हा व्यक्तीवर फसवणूक खंडणी आणि सरकारी कार्यालयाचा दुरुपयोग अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवाय ही व्यक्ती ज्या रुग्णालयात काम करत होती त्या रुग्णालयाच्या 6 व्यवस्थापकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. कारण ही व्यक्ती अनुपस्थित राहत असतानाही या व्यवस्थापकांनी गेल्या 15 वर्षांमध्ये कोणतीही कारवाई केली नव्हती.
या प्रकरणाची चौकशी पोलिसांनी केली असता एक गोष्ट समोर आली ती म्हणजे 2005 मध्ये या व्यक्तीने आपल्या एका व्यवस्थापकाला धमकी दिली होती. ही व्यवस्थापक महिला होती. या महिला व्यवस्थापकाच्या निवृत्तीनंतर हा व्यक्ती सतत कार्यालयात गैरहजर राहायला लागला. पोलीस एका अन्य गुन्ह्याचा तपास करत होते तेव्हा या व्यक्तीचा कारनामा उघडकीस आला.
रुग्णालयाचा मनुष्यबळ विकास विभाग किंवा नवीन व्यवस्थापक यापैकी कोणालाच या प्रकरणाची कल्पना नव्हती. ही व्यक्ती रुग्णालयात कामासाठी का येत नव्हती याची कोणी चौकशी केली नाही. मात्र तो अनुपस्थितीत असतानाही त्याला नियमित वेतन मिळत असल्यामुळे रुग्णालयातील काही बडे अधिकारी या घोटाळ्यात सामील असावेत असा ही पोलिसांना संशय आहे. पोलिस त्यादृष्टीने या प्रकरणाचा तपास करीत आहेत.