पुणे -मंगळवार पेठेतील महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयाच्या तळमजल्यावर सोमवारी सकाळी आगीची दुर्घटना घडली. शॉकसर्किटमुळे जळालेल्या वायरच्या ठिणग्या कचऱ्यात पडल्याने ही आग लागली. मात्र, रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे बेसमेंटमधील इतर साहित्य हटवण्यात आले. तसेच अवघ्या काही मिनिटांत आग नियंत्रणात आणण्यात आली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
शहरातील आर्थिक दुर्बल घटकांतील बहुतांश रुग्ण येथे उपचार घेतात. येथे प्रसूतिगृह, पॅथॉलॉजी लॅब, सोनोग्राफी, डायलेसिस, सीटी स्कॅन, कान-नाक-घसा, तसेच हृदयरोग विभाग आहेत. नाममात्र दरांत उपचार होत असल्याने रुग्णालयात 24 तास वर्दळ असते. सोमवारी सकाळी आगीची घटना घडली तेव्हा घटनेवेळी रुग्णालयात तब्बल 200 हून अधिक रुग्ण होते. त्यात नवजात अर्भके, गर्भवती, सोनोग्राफी तसेच डायलिसिससाठी आलेल्या रुग्णांसह, लसीकरणासाठी आलेले नागरिकही तेथे होते. दरम्यान, सकाळी 10.40 च्या सुमारास बेसमेंटमधून अचानक धूर येण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला काही काळ गोंधळ उडाला. मात्र, हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णांना धीर देत परिस्थिती नियंत्रणात आणली.
फर्निचर आणि कचऱ्याचा ढीग
रुग्णालय बेसमेंट आणि परिसरात मोठ्या प्रमाणात फर्निचर तसेच इतर कचरा साठलेला आहे. सोमवारीही काही वायर जळाल्यानंतर त्याच्या ठिणग्या या कचऱ्यात पडल्या. त्यामुळे आग भडकली. त्यावेळी बेसमेंटमध्ये कचरा आढळून आला. त्यावरून तेथे स्वच्छता होत नसल्याचे, तसेच आग लागल्यास येथील साहित्यामुळे ती भडकण्याची शक्यता अधिक होती. या रुग्णालय आवाराची नियमित स्वच्छता होत नाही का आणि झालीच तर कचरा उचलला जात नाही का? असा प्रश्न आहे.
बेसमेंटला वाहनांचा विळखा
रुग्णालयाच्या बेसमेंटला वाहनांचे पार्किंग आहे. त्यामुळे छोटी रुग्णवाहिका वगळता इतर कोणतीही वाहने आत जाऊ शकत नाहीत. या वाहनतळात या भागातील अनेक नागरिक खासगी वाहने उभी करतात, अशा तक्रारी यापूर्वीही अनेकदा करण्यात आलेल्या आहेत. मात्र, त्याबाबत राजकीय हस्तक्षेप होत असल्याने दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आगीची घटना घडल्यास आत जातानाही अग्निशमन कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागली.
दोन दिवसांपूर्वीच झाले होते मॉकड्रिल
राज्यात गेल्या काही दिवसांत रुग्णालयांत आगीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे महापालिकेने मागील आठवड्यापासून रुग्णालयांचे फायर ऑडिट तसेच मॉकड्रिल सुरू केले आहे. आग लागल्यास तातडीने काय करावे, याबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. कमला नेहरू रुग्णालयात शुक्रवारी मॉकड्रिल करण्यात आले. त्यामुळे सोमवारी येथील कर्मचाऱ्यांनी आग नियंत्रण सुरू करत 10 वाजून 45 मिनिटांनी अग्निशमन दलाला फोन केला. तोपर्यंत अन्य कर्मचाऱ्यांनी फर्स्टएड पाइपने आग आटोक्यात आण्यास सुरुवात केली. फायर ब्रिगेडचे पथक काही मिनिटांतच पोहोचले. तोपर्यंत या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली होती. तसेच आग भडकू शकणाऱ्या वस्तू तेथून हटवल्या.
राज्यात रुग्णालयात आगीच्या घटना घडल्याने पालिकेने तातडीने मोठ्या हॉस्पिटल्सचे फायर ऑडिट सुरू केले आहेत. त्यासाठी आरोग्य विभागाने अग्निशमन दल, विद्युत तसेच भवन विभागास पत्र दिले आहे. अग्निशमन यंत्रणेची तपासणी केली असून ती सुस्थितीत आहे. मात्र, भवन तसेच विद्युत विभागाकडून अद्याप तपासण्या झालेल्या नाहीत.
– डॉ. अंजली साबणे,सहायक आरोग्य प्रमुख, मनपा
=================
===================
====================