Gaza Attack Death| इस्रायल-हमास युद्धात भारतीय लष्करातील माजी कर्नल वैभव काळे यांचा मृत्यू झाला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आणि संरक्षण विभागात ‘संरक्षण समन्वय अधिकारी’ म्हणून वैभव अनिल काळे काम करत होते. कर्नल काळे सोमवारी सकाळी आपल्या सहकाऱ्यांसह संयुक्त राष्ट्रांच्या वाहनाने राफा येथील युरोपीय रुग्णालयाकडे जात असताना त्यांच्या वाहनावर हल्ला झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे सहकारी गंभीर जखमी झाले.
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात आंतरराष्ट्रीय व्यक्तीचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. काळे यांच्या मृत्यूबद्दल संयुक्त राष्ट्रांचे महासचिव गुटेरेस यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. तसेच संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अंतोनिओ गुटेरेस यांनी या हल्ल्याची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी केली आहे. इस्रायलनेही या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
नुकतेच इस्रायलने हमासचा खात्मा करण्यासाठी रफाह हल्ला करण्याची घोषणा केली होती. या अंतर्गत ते गेल्या अनेक दिवसांपासून रफाहवर मिसाईल्सने हल्ला केला. त्यादरम्यान सोमवारी काळे हे त्यांच्या इतर साथीदारांसह वाहनातून रफाह येथील युरोपियन रुग्णालयाकडे जात होते. त्यादरम्यान इस्रायलकडून डागण्यात आलेले क्षेपणास्त्र काळे यांच्या वाहनावर पडल्याने ते जागीच ठार झाले.
वैभव काळे मूळचे नागपूरचे
कर्नल वैभव काळे हे मूळचे नागपूरचे होते. त्यांचे वय ४६ होते. त्यांनी भारतीय भवन्स विद्यामंदिरात शालेय शिक्षण झाले आहे. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांनी बी.ए केले होते. त्यानंतर त्यांनी वर्तनशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याची पदवी मिळवली.
वैभव काळे हे एनडीए आणि नंतर आयएमएच्या माध्यमातून सैन्यात दाखल झाले. ११ जम्मू काश्मीर रायफल्स अंतर्गत विविध आघाड्यांवर काम केले. २२ वर्षांच्या सेवेनंतर २०२२ मध्ये त्यांनी लष्करातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर त्यांचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
याशिवाय त्यांनी दोन वेगवेगळ्या खासगी कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदावर काम केले. पण त्यांनी त्या नोकऱ्या सोडल्या आणि संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांच्या अंतर्गत ‘यूएनडीएसएस’ मध्ये सेवा देण्यास सुरुवात केली. युनायटेड नेशन्समध्ये सामील झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग गाझा येथील रफाह येथे झाली. त्यानंतर ते १२ एप्रिल रोजी निरीक्षक पदावर रुजू झाले.
हेही वाचा:
चार टप्प्यातील मतदानानंतर भाजप किती जागा जिंकणार? अमित शहा यांनी दिलं ‘उत्तर’