मुंबई – साकेत मायनेनी आणि स्थानिक खेळाडू ऋतुजा भोसले टेनिस प्रीमियर लीगमध्ये पुणे जग्वार संघाचे प्रतिनिधित्व करतील. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक पुनित बालन या संघाचे सह मालक आहेत.
ही स्पर्धा या वर्षअखेरीस मुंबईत होणार आहे. या लीगसाठी मुंबईत सेलिब्रेशन स्पोर्टस क्लब येथे झालेल्या लिलावात पुणे फ्रॅंचाईजीने साकेतला 4.40 लाख रुपयाला खरेदी केले. लिलावासाठी अ श्रेणीतील खेळाडूंची पायाभूत किंमत 2.5 लाख निश्चित करण्यात आली आहे. त्याचवेळी पुण्याने ऋतुजासाठी 3 लाख रुपये मोजले. त्याचवेळी सध्या पुणे येथे सुरू असलेल्या 15 हजार डॉलरच्या आयटीएफ टेनिस स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या इशाक इक्बाल यालाही त्यांनी आपल्या संघात स्थान दिले आहे. टेनिस प्रीमियर लीगच्या तिसऱ्या टप्प्यात साह आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू सहभागी होणार आहेत.
लिलावामध्ये सर्वाधिक बोली भारताचा एकेरीतील अव्वल खेळाडू रामकुमार रामनाथन याला लागली. त्याला 4.5 लाख रुपये देत मुंबई लिओन आर्मीने खरेदी केले. भारताचा अनुभवी खेळाडू लिएंडर पेस संघाचा सहमालक आहे. भारताचा सध्याचा अव्वल मानांकित खेळाडू प्रज्ञेश गुणेश्वरनला राजस्थान टायगर्स संघाने 3.40 लाख रुपयांना खरेदी केले. भारताचा दुहेरीतील आघाडीचा खेळाडू दिवीज शरण याला गुजरात पॅंथर्सने 4.10 लाख रुपये मोजले. पुरव राजा 3 लाख रुपयांना चेन्नई स्टॅलिन्सकडे गेला. महिलांमध्ये सर्वाधिक बोली भारताची अव्वल मानांकित अंकिता रैना हिला लागली. तिला 4.10 लाख रुपयंना हैदराबाद स्ट्रायकर्सने खरेदी केले.
लीगमधील आठ फ्रॅंचाईजी मालकांसह सहमालक लिएंडर पेस, रकुल प्रीत सिंग, सोनाली बेंद्रे आणि दिव्या खोसला कुमार या वेळी आपल्या संघांसाठी सर्वोत्तम खेळाडू निवडण्यासाठी उपस्थित होते. प्रसिद्ध दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांची उपस्थितीही विलक्षण होती. ते नेहमीच या लीगच्या पाठीशी उभे राहिले आहेत.
त्याचबरोबर चेन्नई स्टॅलिन्स संघाचे एक पुरस्कर्ते असलेल्या बॉडी फर्स्ट कंपनीचे मालक आणि अभिनेता सुनील शेट्टी देखील या वेळी उपस्थित होते. या लीगचे सर्वेसर्वा कुणाल ठाकूर आणि मृणाल जैन यांनी या वर्षी ही स्पर्धा नक्कीच रोमहर्षक होईल असा विश्वास व्यक्त केला.
मुंबई : टेनिस प्रीमियर लीगमधील खेळाडूंच्या लिलावाप्रसंगी पुणे जग्वार संघाचे सहमालक प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे (डावीकडे), प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक पुनित बालन व संघाची मेन्टॉर व प्रसिद्ध टेनिसपटू व प्रशिक्षक राधिका तुळपुळे आदी उपस्थित होते.