पाकिस्तान क्रिकेट मंडळाने बांधले गुडघ्याला बाशिंग

लाहोर – भारताविरुद्ध लवकरच द्विपक्षीय मालिका खेळवली जाईल, असा विश्‍वास व्यक्त करताना पाकिस्तान क्रिकेट मंडळाने बीसीसीआयशी कोणताही संपर्क न साधता एकतर्फीच गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.

जागतिक क्रिकेटमध्ये ऍशेस कसोटी मालिकेपेक्षाही जास्त टीआरपी भारत व पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मालिकेला मिळतो. संपूर्ण जगभरातील चाहते या दोन देशांदरम्यान होत असलेल्या मालिकेसाठी कायम प्रतीक्षेत असतात. मात्र, दोन्ही देशांच्या संबंधात सातत्याने तणाव असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांत केवळ आयसीसीच्या स्पर्धा वगळता द्विपक्षीय मालिका झालेल्या नाहीत.

तसेच बीसीसीआयला केंद्र सरकारने पाकिस्तानशी खेळण्याबाबत परवानगीही दिलेली नाही. तरीही पाकिस्तान मंडळाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी एकतर्फीच विश्‍वास व्यक्त करताना भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करेल, असा विश्‍वासही व्यक्त केला आहे. तसेच आगामी आशिया करंडक स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानात येण्यास तयार होईल, असेही मणी यांनी म्हटले आहे.

गेल्या जवळपास 14 वर्षांत या दोन संघात द्विपक्षीय मालिका झालेली नाही. येत्या काळात आशिया स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला मिळालेले असल्याने भारतीय संघ पाकिस्तानात येईल, असे सांगितले जात असले तरीही या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अद्याप बीसीसीआयला केंद्र सरकारने हिरवा झेंडा दाखवलेला नाही. तरीही मणी यांनी विश्‍वास व्यक्त केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.