सातारा (प्रतिनिधी) – हद्दवाढीत सातारा शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या भागासाठी पालिकेने नगरविकास मंत्रालयाकडे 51 कोटी रुपयांचा आराखडा सादर केला आहे. या संदर्भात खा. उदयनराजे भोसले यांनी सोमवारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले. हा निधी लवकरात लवकर पालिकेला देण्याची ग्वाही ना. शिंदे यांनी दिल्याची माहिती उदयनराजेंनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या पत्रकात म्हटले आहे की, सातारा शहरातील विविध प्रश्नांवर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. पालिकेची हद्दवाढ झालेल्या नवीन क्षेत्राचा विकास आराखडा, पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी नावीन्यपूर्ण योजनेतून निधी, कास धरणाची उंची वाढवण्याचे काम व बंदिस्त पाइपलाइनसाठी निधी, करमाफीसाठी राज्य शासनाची मान्यता, नवीन विद्युतदाहिनी आदी मुद्द्यांवर या भेटीत चर्चा झाली. हद्दवाढीत आलेल्या खेड, गोडोली, विलासपूर, शाहूपुरी, करंजे, दरे खुर्द, कोडोलीचा काही भाग, शाहूनगर, गोडोलीचा त्रिशंकू भाग येथील 160 किमी लांबीचे रस्ते, 17 किमी लांबीची गटारे, शंभर पथदिवे, परिसरातील खुल्या जागांचा विकास,
फाशीचा वड, चार भिंती, अजिंक्यतारा, नवीन बागा, ओपन जीम, ठिकठिकाणी वृक्षारोपण आदी कामांचा आराखडा ना. एकनाथ शिंदे यांना सादर करण्यात आला आहे. पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी बाबासाहेब कल्याणी यांनी अवघ्या एक रुपयात 40 गुंठे जागा दिली आहे. तेथील प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी राज्य शासनाने नावीन्यपूर्ण योजनेतून भरीव निधी देण्याची मागणीही ना. एकनाथ शिंदे यांना केली आहे.
या प्रशासकीय इमारतीसाठी पहिल्या टप्प्यातील निधी या महिनाअखेरीस वितरीत केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. त्यामुळे प्रशासकीय इमारतीचे बांधकाम यावर्षी सुरू करता येईल. कास धरण उंची वाढवण्याच्या प्रकल्पाला राज्य शासनाकडून मंजूर झालेला निधी तातडीने मिळावा. कासचे पाणी बंदिस्त पाइपलाईनने आणायच्या प्रकल्प अहवालास मंजुरी व निधी मिळावा, अशी मागणी केली आहे.
त्यासाठी या वर्षापासून टप्याटप्याने निधी देण्याचे ना. शिंदे यांनी मान्य केले आहे. संगम माहुली येथे अंत्यसंस्कारासाठी विद्युत दाहिनी बसवण्याची मागणी केली असता, ना. शिंदे यांनी तातडीने मंजुरी दिली. त्याचबरोबर राजवाडा येथे जुन्या नगरपालिका कार्यालयाच्या जागेत आर्ट गॅलरीच्या प्रस्तावासही ना. शिंदे यांनी मंजुरी दिली आहे.