पुसेगाव – कॉलेज सुटल्यावर मैत्रीणीसमवेत घरी परतणाऱ्या युवतीची छेडछाड करून तिला धमकी देणाऱ्या अजय अनिल पाटोळे (वय 20), युवराज शिवाजी पाटोळे (वय 23) व तुकाराम धनाजी पाटोळे (वय 23, सर्व रा. खटाव) यांना वडूज येथील जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी तीन महिने कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली.
खटाव तालुक्यातील एक युवती कॉलेज सुटल्यावर मैत्रीणीसमवेत घरी परतत होती. त्यावेळी अजय पाटोळे, युवराज पाटोळे व तुकाराम पाटोळे हे आरोपी मोटारसायकल (एमएच-11-बीडब्ल्यू-2006) वरून आले. खटाव येथील मराठा चौकात अजय पाटोळेने त्या युवतीला मोटारसायकल आडवी मारून थांबवले. अजयने युवतीचा हात धरून अश्लील हावभाव केले. याबाबत पोलिसांकडे तक्रार केल्यास बघून घेण्याची धमकीही तिला दिली होती.
या प्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात 5 ऑक्टोबर 2018 रोजी गुन्हा दाखल झाला होता. पोलीस उपनिरीक्षक पी. एन. इंगळे यांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपींना अटक केली होती. या प्रकरणी वडूज येथील न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील अजित कदम (साबळे) यांनी काम पाहिले.
या खटल्यात पाच साक्षीदारांच्या साक्षी, पोलिसांनी सादर केलेले पुरावे व सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. वाय. काळे यांनी तिन्ही आरोपींना तीन महिने कारावास, प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास एक महिना, अशी शिक्षा ठोठावली.
या कामी प्रॉसिक्युशन स्कॉडचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, हवालदार नानासाहेब कारंडे, दत्तात्रय जाधव, दीपक शेडगे, सागर सजगणे, अक्षय शिंदे यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले.