करोनामुळे मानवप्राणी जबाबदारीने राहील आणि निसर्गाच्या सर्व घटकांचा आदर करेल, असे वातावरण तयार झाले. यासाठी निसर्गाचे संगोपन आणि सन्मानार्थ जनजागृतीला सुरुवात होईल, असे वाटू लागले होते. परंतु असे काहीच घडले नाही. गेल्यावर्षी एका हत्तिणीला अननस खाऊ घातले. अननसमध्ये ठेवलेले फटाके फुटले. यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या कृत्यात त्या हत्तिणीचाच नाही तर तिच्या गर्भात असलेल्या पिलाचाही मृत्यू झाला. भारतासारख्या भावनिकदृष्ट्या संवेदनशील देशात प्रत्येक जीवात ईश्वराचा अंश म्हणून पाहिले जाते. पण ही काळीमा फासणारी आहेच, त्याचबरोबर समाजाच्या बदलत्या मानसिकतेचे दर्शन घडवणारी आहे.
या घटनेमुळे संपूर्ण देशात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. प्राण्यांच्या हक्काची जपवणूक करण्याबाबत वृत्तवाहिन्यांवर चर्चा झाली. परंतु ती कालांतराने हवेत विरून गेली. आता तमिळनाडूतील एका हत्तीला निर्दयतेने मारहाण करत असल्याचा व्हिडिओ समोर आला. हा व्हिडिओ एका देखभाल केंद्रावरील आहे. हत्तीला एका झाडाला बांधले असून त्याला सर्वजण काठीने मारत असल्याचे व्हिडिओत दिसते. दोन्हीही आरोपी माहुत असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओ एका पर्यटकाने केला. हे केंद्र किंवा रिज्यूवेनेशन कॅम्प कोइमतूरपासून 50 किमी अंतरावर ठेक्कमपट्टी येथे आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाइल्ड लाइफच्या कार्यकर्त्यांनी दोषींवर कडक कारवाईची मागणी केली.
व्हिडिओ तयार करणाऱ्याच्या मते, हत्ती आजारी होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते. माहुत हा अतिशय निर्दयतेने त्यास मारहाण करत होता आणि तो या मारहाणीमुळे विव्हळत असल्याचे व्हिडिओत दिसते. हा हत्ती श्रीविल्लीपुथूर मंदिराचा असल्याचे सांगण्यात येते. 48 दिवसांचा कॅम्प हा हिंदू रिलिजस अँड चॅरिटेबल एंडोमेटसकडून लावण्यात येतो. याप्रकरणी अधिकाऱ्याने माहुताला निलंबित केले असून दुसऱ्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. प्रश्न कारवाईपुरता मर्यादित नाही, तर मानसिकतेचा आहे. देशात शिक्षेचा धाक राहिला असता तर गुन्हेगारी केव्हाच संपुष्टात आली असती. एखादी व्यक्ती आपल्या स्वार्थासाठी किंवा राग व्यक्त करण्यासाठी अशा प्रकारे अत्याचार कसे काय करू शकते, हा प्रश्न आहे. प्राण्यांवरचे अत्याचार कोणत्याही स्थितीत थांबवायला हवेत.
अर्थात, यासाठी सरकारने 1972 भारतीय वन्यजीवन संरक्षण अधिनियम मंजूर केला होता. भारतीय दंड संहितेच्या कलम 428 आणि 429 नुसार प्राण्यांवर विषप्रयोग करणे, हत्या करणे, त्यांची थट्टा मस्करी करणे या कारणावरून दोन वर्षाची शिक्षा किंवा दंडाची तरतूद केली आहे. परंतु या कलमातंर्गत आतापर्यंत किती जणांना कठोर शिक्षा झाली, हे समजू शकले नाही. अभिनेता सलमान खानने राजस्थानात चिंकाराची शिकार केल्याने एक दिवसाची शिक्षा झाली. तुरुंगाबाहेर तो “हीरो’च्याच अर्विभावात आला. केवळ फोटो काढण्यापुरती नाही तर प्रत्यक्षातही प्राण्यावर प्रेम करणे गरजेचे आहे. भारतीय घटनेच्या कलम 51 (अ) नुसार प्रत्येक प्राण्यांविषयी सहानुभूती ठेवणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. जीवजंतू हे आपल्या हक्कासाठी लढा उभारू शकत नाहीत. अशावेळी आपणच त्यांच्या संरक्षणासाठी उभे राहणे अपेक्षित आहे.
- अपर्णा देवकर