सातारा, (प्रतिनिधी)- कर्म प्रतिष्ठानच्यावतीने नुकत्याच आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्याला विविध आस्थापनांचा आणि युवावर्गाचा मोठा प्रतिसाद मिळाला. क्वासिकॉर्प, एसबीआय, आयआयएफएल, माहेश्वरी व्हेन्च्युअर्स, आकाशगंगा कनस्ट्रक्शन, बस्किन रॉबिन,
पिझ्झा हट,केएफसी अशा काही कंपनी युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला होता अशी माहिती प्रतिष्ठानच्या संस्थापिका अर्चना देशमुख यांनी दिली. पुणे विभाग माध्यमिक शिक्षक शिक्षेकेतर पतसंस्थेच्या सभागृहात झालेल्या मेळाव्यासाठी जवळपास 140 युवक युवतींनी नाव नोंदणी केली होती.
पैकी 87 जणांना वेगवेगळ्या कंपन्यांनी आॅफर लेटर दिले. अगदी दोन ते तीन दिवसांच्या छोट्या कालावधीत कार्यक्रमांचे नियोजन झाल्यानंतर असंख्य हात पाठीशी उभे राहिल्याने मेळावा यशस्वी झाल्याचे अर्चना देशमुख यांनी सांगितले. हा मेळावा एक सुखद अनुभव देणारा होता, असे युवकांनी सांगितले. प्रतिष्ठानच्या सदस्या अंजली ढाणे, वैशाली माने, अपर्णा सावंत, उज्वला संकपाळ दी प्रमुख उपस्थित होत्या.