मेलबर्न – बेलारूसची मानांकित टेनिसपटू अर्यना सिबालेन्का वस्पेनचा राफेल नदाल यांनी आपापले सामने जिंकत ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत आगेकूच कायम राखली आहे. सिबालेन्काने अमेरिकेच्या आन लीचा 6-3, 6-1 असा पराभव करत चौथी फेरी गाठली. पुरूष एकेरीत स्पेनच्या नदालने अपेक्षेप्रमाणे तिसरी फेरी गाठताना अमेरिकेच्याच मायकल मोहचा 6-1, 6-4, 6-2 असा सहज पराभव केला.
महिलांमध्ये कनेपीने अमेरिकेच्या सोफिया केनिनला अवघ्या 64 मिनिटांत 6-3, 6-2 असा पराभवाचा धक्का दिला. अग्रमानांकित ऍशले बार्टीने ऑस्ट्रेलियाच्या दारिया गावरिलोव्हा हिचे आव्हान 6-1, 7-6 असे परतवून लावत तिसरी फेरी गाठली. पाचव्या मानांकित एलिना स्वितोलिना हिने कोको गॉफचे आव्हान 6-4, 6-3 असे संपुष्टात आणले. रशियाच्या चौथ्या मानांकित डॅनिल मेदवेदेव याने स्पेनच्या रॉबेटरे कार्बालेस बाएना याच्यावर 6-2, 7-5, 6-1 असा सरळ तीन सेटमध्ये विजय मिळवत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या स्टेपानोस त्सित्सिपासला तिसरी फेरी गाठण्यासाठी कडवा संघर्ष करावा लागला. पाचव्या मानांकित त्सित्सिपासला ऑस्ट्रेलियाच्या थनाकी कोक्किनाकीस याने चांगलेच झुंजवले. अखेर पाच सेटपर्यंत रंगलेल्या या मॅरेथॉन सामन्यात त्सित्सिपासने 4 तास 32 मिनिटे झुंज देऊन 6-7, 6-1, 6-1, 6-7, 6-4 असा विजय मिळवला.
19 व्यांदा ऑस्ट्रेलियन ग्रॅंडस्लॅम स्पर्धेत खेळणाऱ्या 39 वर्षीय फेलिसियानो लोपेझने दुसऱ्या फेरीत इटलीच्या लोरेंझो सोनेगो याच्यावर 5-7, 3-6, 6-3, 7-5, 6-4 असा विजय मिळवला. त्याची तिसऱ्या फेरीत रशियाच्या आंद्रेय रुबलेव्ह याच्याशी गाठ पडणार आहे. सातव्या मानांकित रुबलेव्ह याने ब्राझीलच्या थियागो मॉंटेरो याच्यावर 6-4, 6-4, 7-6 अशी मात केली.