शिक्रापूर -कोरेगाव भीमा (ता. शिरूर) कार्यालयातील महिला तलाठी व त्यांच्या दोन साथीदारांना लाच घेताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. तिघांवर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
अश्विनी दत्तात्रय कोकाटे असे लाच घेताना ताब्यात घेण्यात आलेल्या महिला तलाठ्याचे नाव असून त्यांचे दोन साथीदार अश्विनी सुहास पाचारने व निवृत्ती लक्ष्मण कानगुडे या दोघांना देखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले आहे.
तलाठी कोकाटे यांनी तक्रारदार व्यक्तीची सातबारा उताऱ्यावर नाव नोंदणीसाठी आणि जमीन वाटपाची नोंद करण्यासाठी तक्रारदार व्यक्तीकडून चाळीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून सापळा लावून या तक्रारीची पडताळणी केली असता वरील व्यक्तींनी लाचेची वीस हजार रुपये रक्कम स्वीकारताना तिघांना रंगेहात पकडण्यात आले.