शिक्रापूर – सणसवाडी (ता. शिरूर) येथे ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव झाल्याच्या वादातून काही युवकांनी एका युवकास लाकडी दांडके तसेच इतर साहित्याने बेदम मारहाण केली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात दहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अजय श्रीहरी दरेकर, सागर श्रीहरी दरेकर, सुजित हिरामण दरेकर, मृणाल कैलास दरेकर, तुषार लांडगे यांसह अनोळखी पाच युवक (सर्व रा. सणसवाडी ता. शिरूर) अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत. रवींद्र बबन दरेकर (वय 34, रा. प्रगतीनगर सणसवाडी) हे मारहाणीत जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी चंदननगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमीचे भाऊ रामदास बबन दरेकर यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सणसवाडी येथील अजय दरेकर व सागर दरेकर यांची आई कल्पना दरेकर या ग्रामपंचायत निवडणुकीस उभ्या असताना त्यांचा रवींद्र बबन दरेकर याच्याशी काही कारणातून वाद झाला होता.
कल्पना दरेकर यांचा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पराभव झाला याचा राग या दोघा भावांच्या मनामध्ये होता. तर 11 फेब्रुवारी रोजी रवींद्र दरेकर हे त्यांच्या सणसवाडी येथील कार्यालयात असताना अचानकपणे दोन कारमधून अजय दरेकर, सागर दरेकर, सुजित दरेकर, मृणाल दरेकर, तुषार लांडगे यांसह एकूण दहाजण हातामध्ये लाकडी दांडके, लोखंडी गज, पट्टा घेऊन आले.
त्यांनी रवींद्र दरेकर यांच्या कार्यालयात जाऊन आपल्या आईचा ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान झालेला वाद आणि निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या रागातून मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी कार्यालयात मारहाण करून त्यांनी कार्यालयाबाहेर आणले आणि बाहेरदेखील लाकडी दांडके, लोखंडी गज व पट्ट्याने बेदम मारहाण करत शिवीगाळ दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली.
पुढील तपासासाठी गुन्हा शिक्रापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असल्याने या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण भालेकर हे करीत आहेत.