चंदीगड : जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कोणतेही काम केले तर त्यात यश नक्कीच मिळते असेच म्हटले गेले आहे. याचेच जिवंत उदाहरण हरियाणाच्या जपना ऋषी आहेत. कारण जपनाने केवळ 6 बाय 4 च्या जागेत सुरु केलेला व्यवसाय आता तीन कोटीपर्यंत जाऊन पोहचला आहे. कोणताही व्यवसाय करण्यासाठी तुमच्याकडे जर चांगली कल्पना असेल, तर तुम्ही रग्गड पैसा कमवू शकता, हे जपनाने दाखवून दिले आहे.
जपना ऋषी या तरुणीने हरियाणात एका छोट्या जागी आपला व्यवसाय सुरु केला होता. छोटी जागा म्हणजे केवळ 6 बाय 4 ची खोलीच त्या खोलीत फक्त सतरंजी अंथरता येईल एवढीच जागा तिच्याकडे होती. ज्यामध्ये माणूस राहूही शकत नाही, अशी अर्धी खोली. एखादी सतरंजी बसेल एवढ्याच जागेत जपनाने आपला व्यवसाय सुरु केला. या व्यवसायाला जपनाने मेहनतीची जोड दिली…आणि पाहता पाहता तिचा व्यवसाय हा कोट्यवधीपर्यंत जाऊन पोहचला.
जपना ऋषी कौशिक ही पटियालाजवळची रहिवासी आहे. जपनाने पटियालामध्ये पंजाब विद्यापीठातून फूट टेक्नॉलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर तिने नोकरी सुरु केली. नोकरीच्या निमित्ताने जपनाने कोका कोला, नेस्ले यासारख्या मोठ्या कंपन्यांसोबत काम केले. त्यानंतर तिने 2016 मध्ये कुपोषणाबाबत तिच्या वाचनात आले. भारतातील कुपोषणाचे भीषण चित्र तिच्यासमोर आले.
जपनाने पती विवेक कौशिक यांच्यासोबत 2016 मध्ये हंग्री फॉएल नावाची कंपनी सुरु केली. त्यानंतर त्यांनी 5 रुपये आणि 10 रुपयात विकले जाणारे छोटे केक/मफिन, चोको एनर्जी यासारख्या छोटे बेकरी प्रोडक्ट विकण्यास सुरुवात केली. त्याचवेळी त्यांनी गरिबांपर्यंत पोषक पदार्थ पोहोचवण्यासाठी अर्थात सुका मेवा काम सुरु केला. त्यांनी Nut Lite सुरु केले. ज्यामध्ये सुका मेवा जसे काजू, बदाम यांचा समावेश आहे. त्यांची किंमत कमी ठेवली.
त्यांचे हे प्रोडक्ट आता दिल्ली, NCR, हरियाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेशांसह विविध राज्यातील मोठ्या शहरात पोहोचले आहेत. अत्यंत स्वस्त दरात आरोग्यदायी सुका मेवा तो ही खात्रीशीर मिळत असल्याने, ग्राहकांची त्याला पसंती मिळत आहे. अन्य कंपन्याही सुका मेवा देत आहेत. मात्र त्याची किंमत किमान 50 पासून सुरु होते, तर जपना आणि विवेक ते 10 रुपयांपासून देत आहेत. त्यांनी हळूहळू आपल्या व्यवसायाची व्याप्ती वाढवली. त्यांना आता चांगला प्रतिसाद मिळत आहे.
जपना आणि विवेक यांच्या या छोट्या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता त्यांची वार्षिक उलाढाल तब्बल तीन कोटीपर्यंत पोहोचली आहे. लो कॉस्ट प्रोडोक्शन अर्थात कमीत कमी खर्चामुळे ते व्यवसायात वैविध्य आणत आहेत. किमान नफा आणि जास्त विक्री या तत्त्वावर दोघे काम करत आहेत.