पिंपरी-चिंचवड : 100 हून अधिक ‘व्हॉइट कॉलर’ आरोपी

150 कोटी रुपयांच्या 28 आर्थिक गुन्ह्यांचा तपास सुरू

पिंपरी – आर्थिक गुन्हे शाखेकडून सध्या 150 कोटी रुपयांच्या 28 गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. या गुन्ह्यामध्ये 100 हून अधिक व्हॉइट कॉलर आरोपी आहेत. तपासाला वेळ लागत असल्याने हे व्हाइट कॉलर आरोपी शहरात खुलेआम वावरत आहेत.

तीन कोटी किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा आर्थिक घोटाळा असल्यास त्याचा तपास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍तालयातील आर्थिक गुन्हे शाखेकडे जातो. आत्तापर्यंत आर्थिक गुन्हे शाखा व अमली पदार्थ विरोधी पथक यांचा दोन्ही विभागांचा पदभार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांच्याकडे होता. मात्र येणाऱ्या तक्रारींची संख्या पाहता या विभागाला स्वतंत्र पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी देण्याचा निर्णय पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी घेतला आहे.

यामुळे या विभागाचा पदभार सध्या पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांच्याकडे आहे. आर्थिक गुन्ह्यांमधील आरोपींवर वेळीच कारवाई होत नसल्याने आर्थिक संस्थांमधील अपहारांचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. कधी दामदुप्पट तर कधी आकर्षक व्याजाच्या आमिषाने फसवणूक होते.

बहुतांशी मल्टीनॅशनल कंपन्या, पतसंस्था, सहकारी बॅंकांनी गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडविले आहे. अडकलेले पैसे परत मिळतील या आशेने गुंतवणूकदार आर्थिक गुन्हे शाखेत हेलपाटे मारत आहेत. आर्थिक घोटाळे करणाऱ्या आरोपींना अटक करा, त्यांच्या मालमत्ता जप्त करा, अशी मागणी वेळोवेळी गुंतवणूकदारांकडून होत आहे.

कुशल मनुष्यबळाची आवश्‍यकता
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाच्या हद्दीतील संस्कार ग्रुप, गुडविन ज्वेलर्स, सेवा विकास बॅंक हे महत्वाचे तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे आहे. कागदपत्रांची जमवाजमव करून झालेला तपास पुराव्यासह न्यायालयात सादर करणे, न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करणे, आदी कामांसाठी मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ लागते. अनेकदा आरोपी जामीनावर असल्याने तो तपास कार्यात सहकार्य करीत नाही. यामुळे हा तपास इतर गुन्ह्यांच्या प्रमाणात संथ गतीने होत असतो. अशा गुन्ह्यांचा तपास किचकट आणि वेळखाऊ असतो. तपासात त्रुटी राहिल्यास त्याचा फायदा आरोपींना होतो. कधी कधी तर या गुन्ह्यांच्या तपासाकरिता सीएंची देखील मदत घ्यावी लागते. मात्र त्यांचे मानधन कोण देणार, असाही प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होतो. सीए देखील आपल्या कामातून तरी किती वेळ पोलिसांना देऊ शकतात, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

आर्थिक गुन्ह्यांचा तपास हा क्‍लिष्ट स्वरूपाचा असतो. त्यामुळे इतर गुन्ह्यांच्या तुलनेत अशा तपासांना वेळ लागतो. या गुन्ह्यातील आरोपींची मालमत्ता शोधणे, त्यावर पुढील कारवाई करणे, शासनाला प्रस्ताव पाठविणे, अशा प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. तपास किती गतीने होत आहे, त्यापेक्षा तपासाचा दर्जा कसा आहे, हे पाहणे महत्वाचे ठरते.
– वसंत बाबर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक-आर्थिक गुन्हे शाखा

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.