शिक्षकांचे शेतात नवनवीन प्रयोग; तांदळाच्या कोठारात गव्हाचे पीक जोमात

मळवली – मावळ तालुक्‍याला तांदळाचे कोठार मानले जाते. मावळातील तांदूळ खूपच प्रसिद्ध असल्याने येथे मोठ्या प्रमाणात तांदळाचे पीक घेतले जाते. बहुतेक शेतकरी येथे भाताचीच लागवड करतात. अशा मावळातील पिंपळोली गावात शिक्षक बंधूंनी गव्हाचे पीक घेतले आहे. शिक्षकी पेशातील या प्रगतीशील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत केलेले नवनवीन प्रयोग येथे नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. त्याचप्रमाणे आता देखील तरारुन आलेले गव्हाचे पीक चर्चेचा विषय ठरत आहे.

पिंपळोली येथील शिक्षक बंधू लक्ष्मण व भरत पिंपळे यांनी नवीन प्रयोग करत शेतात गव्हाच्या पिकाची यशस्वी लागवड केली आहे. पिंपळे बंधू यांनी आपल्या पंधरा गुठे क्षेत्रापैकी दहा गुंठे क्षेत्रात टोकन पध्दतीने श्रीराम जातीचे गव्हाचे पीक लावले. या वेगळ्या प्रयोगाची जोखीम स्वीकारत आणि त्याला परिश्रम व प्रयोगशीलतेची जोड देत पिकाची निगा राखली. परिणामी गव्हाचे पीक जोमात आले आहे.

एका किलो पासून शंभर किलो गव्हाचे उत्पन मिळेल, असा अंदाज आहे. त्यांच्या या प्रयोगामुळे मावळात गव्हाचीही शेती होऊ शकते, असा विश्‍वास अनेकांना आला आहे. तसेच शेताच्या बांधावर विविध फळांची झाडे तर काही भागात भाजीपाला घरगुती सेंद्रीय पध्दतीने केला असून परिसरातील अनेक तरुण शेतकरी या शेतावर येऊन भेट देत पाहणी करत आहेत.

मावळातील शेतकरी पारंपारिक भात पिकाऐवजी दुसऱ्या पिकांकडे वळत आहे. भाताबरोबरच गहू, ज्वारी, पालेभाजांची शेती होऊ लागली आहे. पिंपळोली येथील प्रयोगशील शेतकरी शिक्षक बंधू लक्ष्मण व भरत पिंपळे यांनी शेतात नवीन प्रयोग केले आहेत. याकरिता त्यांना कृषि अधिकाऱ्यांसोबत त्याचे बंधू प्रा. सुभाष पिंपळे व मामा चंद्रकांत गायकवाड यांचे मार्गदशन लाभत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.