नवी दिल्ली – कोणत्याही देशातील सरकारने केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलनाला समर्थन केले नसल्याचे केंद्र सरकारने बुधवारी लोकसभेमध्ये म्हटले आहे. पण त्यावेळी या कायद्याला कॅनडा, ब्रिटन, अमेरिका आणि इतर युरोपियन देशांमधील भारतीय वंशाच्या काही प्रेरित व्यक्तींनी विरोध केल्याचेही सरकारने म्हटले आहे.
आंदोलनाला समर्थन करणाऱ्या देशांची यादी असेल तर ती सरकारने जाहीर करावी, अशी मागणी आयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली होती. ही माहिती सरकारने त्याला उत्तर देताना दिली आहे.
भारताचे मित्र राष्ट्र असणाऱ्या कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर वक्तव्य केल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे राज्यमंत्री वी. मुरलीधरन यांनी दिली. पण भारताने त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना भारताच्या अंतर्गत प्रकरणांसंदर्भात अशाप्रकारचे वक्तव्य हे अयोग्य आणि स्वीकार करण्यासारखे नसल्याचे सांगितले असल्याकडेही मुरलीधरन यांनी लक्ष वेधले.