- लग्नाची थाप
- वेगवेगळी कारणे सांगून लुबाडले पैसे
पिंपरी – अमेरिकेत कॉस्मेटिक सर्जन असून लग्नानंतर भारतात स्थायिक व्हायचे असल्याची थाप मारून डेटींग ऍपवरील भावी पतीने एका महिलेची 12 लाख 29 हजारांची फसवणूक केली. हा प्रकार 20 ऑक्टोबर 2020 पासून 3 फेब्रुवारी 2021 या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून घडला.
+15095982813 व arjunevaskincare101@gmail.com धारक अर्जुन गोपाल, +918974305438 धारक शालिनी अय्यर, +13239912067 धारक गोपाल, मेल आयडी धारक hr.departmentaviation@gmail.com, marylouise934@gmail.com, एसबीआय बॅंक अकाउंट नंबर 34897569971, एसबीआय बॅंक अकाउंट नंबर 203573115303, एसबीआय बॅंक अकाउंट नंबर 39027431531, सिंडीकेट बॅंक अकाउंट नंबर 20132610004360, आयडीएफसी बॅंक अकाउंट नंबर 10040648835, कोटक महिंद्रा बॅंक अकाउंट नंबर 1013880702 धारक व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी अर्जुन गोपाल याची मेट्रोमोनियल डेटिंग ऍपच्या माध्यमातून ओळख झाली. त्यांनतर त्यांनी व्हॉट्स ऍप कॉल, व्हिडीओ कॉल आणि ई-मेलद्वारे एकमेकांशी संवाद साधला. त्यात आरोपी अर्जुन याने ‘तो अमेरिकेत कॉस्मेटिक सर्जन डॉक्टर आहे. त्याला फिर्यादी सोबत लग्न करायचे आहे. भारतात येऊन स्थायिक व्हायचे आहे’ अशी थाप मारली.
त्यानंतर आरोपी अर्जुन याने त्याच्या आईच्या डोक्याला मार लागला असून तिच्यावर उपचारासाठी बेंगलोर येथील शिनॉय फार्म येथील XINOCIN नावाची औषधी बियांचे औषध पाठविण्यासाठी एक लाख 29 हजार 900 रुपये भरण्यास भाग पाडले. अर्जुनचे वडील गोपाल याने फिर्यादी यांच्या वडिलांसोबत मिळून त्याच औषधी बियांचा भागीदारीमध्ये व्यवसाय कारण्याचे आमिष दाखवून त्यापोटी सहा लाख 49 हजार 500 रुपये भरण्यास भाग पाडले. बनावट औषधी बिया देऊन त्या विकत घेण्यासाठी अमेरिकेतील एका कंपनीच्या परचेस मॅनेजरसोबत आपण भारतात येत असल्याचे सांगितले. भारतात एअरपोर्टवर ग्रीन कार्ड नसल्याने पकडले असून तेथून सोडविण्यासाठी दंड म्हणून दोन लाख 70 हजार, आजारी असल्याचे सांगून 80 हजार घेतले. त्याच्या सोबत भारतात आलेल्या परचेस मॅनेजरने व्यवसायासाठी आणलेले डॉलर कस्टमने पकडले असल्याने ते सोडविण्यासाठी एक लाख रुपये देण्यास सांगितले.
वेगवेगळ्या कारणांसाठी आरोपी अर्जुन याने फिर्यादी महिलेकडून 12 लाख 29 हजार 400 रुपये वेगवेगळ्या बॅंक खात्यांवर भरण्यास सांगितले. ते पैसे त्याने परत दिले नाहीत. तसेच औषधी बियांचा व्यवसाय न करता फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांची फसवणूक केली.