सातारा – सातारा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी नंदन बापू अडागळे (वय 46 वर्षे) याला वीस वर्षे सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद सुनावण्यात आली. सह जिल्हा न्यायाधीश पटणी यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.
याबाबत अधिक माहिती अशी की, 24 जून 2018 रोजी पीडित मुलगी तिच्या घरात एकटी असताना आरोपीने तिच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला होता. त्यानंतर या प्रकरणी संबंधित पीडित मुलीने 25 जून 2018 रोजी सातारा तालुका पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती.
त्यानुसार पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम 3 व 4 नुसार आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक व्ही.एस.चव्हाण, अर्चना दयाळ यांनी करून आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
सुनावणी दरम्यान न्यायालयासमोर आलेले साक्षीपुरावे व पीडितेचा जबाब ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला वीस वर्षे सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
या खटल्याचे कामकाज सरकारी वकील नितीन मुके, ए.एस.घार्गे यांनी पाहिले. सरकार पक्षाला सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस नाईक शुभांगी भोसले यांनी पैरवी अधिकारी म्हणून मदत केली.