लंडन – अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडेन हे येत्या 11 ते 13 जून या अवधीत जी 7 देशांच्या बैठकीच्या निमीत्ताने लंडनला जात असून त्या कालावधीत ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावतीने त्यांच्या सन्मानार्थ बकिंगहॅम राजप्रासादात सन्मान समारंभ आयोजित करणार आहेत.
जी सात ही जगातील सात समृद्ध राष्ट्रांची संघटना असून त्यात ब्रिटन, कॅनडा, अमेरिका, फ्रांस, जर्मनी आणि इटाली या देशांचा समावेश आहेत. त्यात आता भारतासह आणखी काही देशांनाहीं निमंत्रित केले जाणार असल्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही त्या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
करोनाच्या साथीमुळे ब्रिटनच्या 94 वर्षीय महाराणी सध्या आपल्या विंडसर कॅस्टल होम येथे वास्तव्याला आहेत. त्या आता पुन्हा आपल्या लंडन येथील पॅलेस मध्ये लवकरच परतणार आहेत असेहीं सांगण्यात येते. तेथेच बायडेन यांचा सत्कार समारंभ होणार आहे.
यावेळी ब्रिटीश राजघराण्यातील सदस्य व अमेरिकेच्या नवनिर्वाचित अध्यक्षांची प्रथमच समोरासमोर चर्चा होईल. बायडेन यांच्या सत्कार समारंभाला ब्रिटनच्या राजघराण्यातील सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत. या समारंभाचा तपशील सध्या निश्चीत केला जात आहे.
बायडेन यांच्या निवडीचे प्रिंस चार्लस यांनी या आधीच त्यांना शुभेच्छा संदेश पाठवून स्वागत केले आहे. ब्रिटनच्या महाराणीने सन 1952 मध्ये सूत्रे स्वीकारली त्यानंतरच्या प्रत्येक अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना त्या भेटल्या आहेत.