कराड (प्रतिनिधी) – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आटके टप्पा येथे कोल्हापूर-पुणे लेनवर टोयोटा इनोव्हा (एमएच-12-केके-3637) व मारुती स्विफ्ट कार यांच्या भीषण अपघातात राहुल दोरगे (वय 28), स्वप्निल शिंदे (वय 28), बाळासाहेब कांबळे (सर्व रा. कात्रज, पुणे) हे पैलवान जागीच ठार झाले. ही दुर्घटना रविवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास झाला.
या अपघातात दोन्ही वाहनांमधील मिळून आठ ते नऊ जण गंभीर जखमी झाले असून दोन्ही वाहनाचा चुराडा झाला आहे. महामार्गावर काचांचा खच पडला होता. जखमींना उपचारासाठी कराडमधील सह्याद्री, कृष्णा व उपजिल्हा रुणालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. गणेश काळे (वय 28), बाळासाहेब गदळे (वय 31), तुषार गावडे व अन्य पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पुण्यातील पैलवान व अन्य काही जण इनोव्हा गाडीतून कोल्हापूरकडून पुण्याकडे निघाले होते. कराडनजीक आटके टप्पा येथे इनोव्हाने पुढे निघालेल्या स्विफ्ट कारला जोराची धडक दिली. त्यामुळे दोन्ही चालकांचा वाहनांवरील ताबा सुटला. स्विफ्टला धडकल्यानंतर इनोव्हा कार महामार्गाच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, इनोव्हामधील राहुल दोरगे, स्वप्निल शिंदे व बाळासाहेब कांबळे हे जागीच ठार झाले, तर इनोव्हा व स्विफ् कारमधील आठ ते नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, महामार्ग मदत केंद्राचे कर्मचारी, कराड तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहनांमधील जखमींना बाहेर काढून उपचारासाठी कराडमधील रुग्णालयांत पाठविले. या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी घोषित केले.
सर्व जखमी पुणे जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. दोन्ही वाहने कोल्हापूरकडून पुण्याकडे भरधाव निघाली होती. घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत पंचनामे करण्याचे काम सुरू होते.