यंत्रचलित माग बसविण्याची परवानगी
मुंबई, ता. 17 – सध्याच्या साध्या मागाऐवजी यांत्रिक (स्वयंचलित) माग बसविण्याची कापड गिरण्यांना परवानगी द्यावयाची असे भारत सरकारने ठरविले असल्याचे येथे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले आहे.
अशा मागांना साधारणतः खालील अटीवर परवानगी देण्यात येईल. एका घटकात किमान 48 व कमाल 144 माग बसविता येतील; 15 व्या भारतीय कामगार परिषदेतील शिफारशीनुसार ही परवानगी देण्यात येईल.
मंदबुद्धी व धूम्रपान
लंडन – माध्यमिक शाळांतील दर तीन मुलांपैकी एक व ग्रामरस्कूलमधील दर चारपैकी एक, 15 वर्षांचे असताना दर आठवड्याला पाच किंवा अधिक सिगारेट ओढतो अशी माहिती “प्रॅक्टिशनर’मधील लेखात प्रा. मॉरिस बॅकेट यांनी दिली आहे. ते म्हणतात, “मंद बुद्धीच्या मुलांत धूम्रपानाची सवय अधिक प्रमाणात आढळून येते. त्यांना आदेश देणाऱ्यांची बोटे निकोटिनने डागाळलेली असल्याने आदेशाचाही विशेष प्रभाव पडत नाही. त्यांनी लेखात धूम्रपानाबाबत अनेक भाकितं मांडलेली आहेत.
राष्ट्रसंघ नकाशासंबंधी खुलासा
राष्ट्रसंघ – राष्ट्रसंघ नकाशात जम्मू-काश्मीरचा भाग भारतीय हद्दीत दाखविण्यात आलेला नाही. यासंबंधी राष्ट्रसंघ सरचिटणीस शूल्ड यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले तेव्हा त्यांचे सहकारी कॉर्डियर यांनी असा खुलासा केला की, नकाशाचा अर्थ लावण्यात चूक होत आहे. हा प्रदेश भारत वा पाकिस्तान अशा कोणत्याही देशाचा म्हणून दाखवला नाही.
वादग्रस्त प्रदेशाचे दर्शन सरहद्दीवर एक तुटलेली रेषा दाखवून घडवले आहे. सुरक्षा समितीचे आदेश राष्ट्रसंघ सचिवालयास पाळावे लागतात. शस्त्रसंधी कमिशनला, जिनेव्हा येथे वाटाघाटी चालू असता त्या सफल होण्याचे मार्गावर असता काही सल्ला देणे इष्ट नाही, असेही सरचिटणीसांतर्फे एका प्रश्नोत्तरात सांगण्यात आले.
अनंत जाधवने धरमतरची खाडी 13 तासांत ओलांडली
मुंबई – अनंत जाधव याने मुंबई ते कुलाबा हे 35 मैलांचे अंतर 13 तास 22 मिनिटांत पोहून यशस्वीरीत्या तोडले. जाधव याने धरमतरच्या धक्क्यापासून पोहावयाला सुरुवात केली आणि गेटवे ऑफ इंडियाला तो लागला. धरमतरहून सकाळी 4 वा. 5 मिनिटांनी निघाला आणि सायं. 5 वा. 27 मिनिटांनी तो गेट वे ऑफ इंडियाला लागला.