अबाऊट टर्न : असाधारण!

-हिमांशू

“मरेपर्यंत फाशी’ या शब्दप्रयोगाचं लहानपणी खूपच आश्‍चर्य वाटायचं. फाशी दिल्यावर माणूस मरणार, हे निश्‍चित असताना असं का लिहिलं-बोललं जातं? या प्रश्‍नाचं उत्तर काही दिवसांनी मिळालं. फासावर लटकवल्यानंतरसुद्धा काही तांत्रिक कारणांमुळे माणूस जिवंत राहू शकतो, हे त्याचं एक कारण. 

अनेक वर्षांनंतर अशाच एका शब्दप्रयोगानं धक्‍का बसलाय. तो म्हणजे, “1075 वर्षांची शिक्षा!’ माणसाचं सरासरी आयुष्य शंभर वर्षं गृहित धरलेलं आहे. काहीजण त्याहून अधिक जगतात, हे मतदानाला जातानाचे त्यांचे फोटो पेपरात पाहून समजतं. एखादा माणूस हजार वर्षांची शिक्षा कशी भोगणार? काही वेळा न्यायालयाकडून वेगवेगळ्या गुन्ह्यांसंदर्भात वेगवेगळ्या शिक्षा सुनावल्या जातात; पण सगळ्या शिक्षा आरोपीनं “एकाच वेळी’ भोगायच्या असतात.

म्हणजे, दहा वर्षांची शिक्षा आजपासून सुरू झाली, तर दुसऱ्या कलमाखाली झालेली तीन वर्षांची शिक्षाही आजपासूनच सुरू होईल. परंतु ज्याला “1075 वर्षांची शिक्षा’ झालीये, त्यानं काय करायचं? अर्थात, या माणसाचं सगळं जीवनच अचाट गोष्टींनी व्यापलेलं आहे. नाव आहे अदनान ओकतार आणि तो तुर्कीतील आहे. इस्तंबूलच्या न्यायालयानं त्याला दहा वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये ही शिक्षा दिलीय. दहा शिक्षा “एकाच वेळी’ भोगायला सुरुवात केली तरी शक्‍य होणार नाही.

अदनानबद्दल ज्या गोष्टी प्रसिद्ध झाल्यात त्या वाचतानाच धक्‍क्‍यामागून धक्‍के बसले. तो चालवत असलेली संघटना बेकायदा असल्याची तक्रार त्याच्या विरोधात होती. त्याच्या पंथातल्या अनेकांची दोन वर्षांपूर्वी धरपकड झाली होती. अखेर 377 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि 78 जणांना अटक झाली. फसवणूक करणे तसंच राजकीय आणि लष्करी माहितीची हेरगिरी करणं हे गंभीर आरोप त्याच्याविरुद्ध आहेतच. परंतु या व्यक्‍तिमत्त्वाबाबतच्या काही गोष्टी मुळात आकलनाबाहेरच्या आहेत.

पहिली गोष्ट म्हणजे, त्याला एक हजार “गर्लफ्रेंड’ आहेत, असं प्रसिद्ध झालंय. लैंगिक शोषण, अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण या आरोपांखालीही त्याच्याविरुद्ध खटला चालवला गेला. परंतु “प्रेम करणं हे मनुष्याचं वैशिष्ट्य आहे आणि महिलांच्या प्रति माझ्या मनातलं प्रेम उफाळून येतं,’ असं या माणसानं भरकोर्टात सांगितलं. म्हणजेच, ज्यांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्याच्यावर आहे, त्यांना तो “गर्लफ्रेंड’ मानतो. “बाप बनण्याची असाधारण क्षमता माझ्यात आहे,’ असाही दावा पठ्ठ्यानं कोर्टात केला म्हणे! नव्वदीच्या दशकातच सेक्‍स स्कॅंडलमध्ये अडकलेल्या एका पंथाचा तो नेता म्हणून अदनान ओकतार प्रकाशझोतात आला होता. त्याच्याकडून फसवणूक आणि लैंगिक शोषण झाल्याच्या तक्रारी अनेक महिलांनी दिल्या होत्या.

या सगळ्यातला गमतीचा (खरं तर अत्यंत गंभीर) भाग असा की, ज्या-ज्या कृत्यांना सामान्य लोक “गुन्हा’ संबोधतात, तो त्याला “पुरुषार्थ’ वाटतो. या विक्षिप्त माणसानं अनेक महिलांना लैंगिक शोषणानंतर गर्भनिरोधक गोळ्या खायला भाग पाडलं होतं. जेव्हा त्याच्या घरावर छापा घातला गेला, तेव्हा तिथून तब्बल 69 हजार गर्भनिरोधक गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या. ही सगळी माहिती वाचल्यानंतर 1075 वर्षांच्या अनाकलनीय शिक्षेचं गूढ नाहीसं झालं. कर्तृत्वच असाधारण म्हणून शिक्षा असाधारण!

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.