मुंबई – अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत जो बायडेन यांचा विजय निश्चित झाल्यावर विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी संसदेच्या परिसरात गुरुवारी अभूतपूर्व गोंधळ घातला आणि पोलिसांबरोबर त्यांचा जोरदार हिंसाचारही झाला. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. अशातच या हिंसाचारातील एका आंदोलकाच्या हातात चक्क भारताचा तिरंगा झेंडा दिसत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरून आता शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी चांगल्याच संतापल्या आहेत.
प्रियांका चतुर्वेदी म्हणालया कि, जो कोणी भारतीय झेंडा फडकवतोय त्याला लाज वाटली पाहिजे. दुसर्या देशात सुरू असलेल्या हिंसक आणि गुन्हेगारी कृतीत सहभागी होण्यासाठी आमचा तिरंगा वापरू नका, अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Whoever is waving this Indian flag should feel ashamed. Don’t use our tricolour to participate in such violent & criminal acts in another country. pic.twitter.com/CuBMkq9Siu
— Priyanka Chaturvedi (@priyankac19) January 7, 2021
तसेच, भाजपाचे खासदार वरुण गांधी यांनीही या घटनेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तिथे भारताचा झेंडा का आहे? ही एक अशी लढाई आहे ज्यामध्ये आपण सहभागी होण्याची नक्कीच आवश्यकता नाही, असे वरुण गांधी यांनी म्हंटले आहे.
Why is there an Indian flag there??? This is one fight we definitely don’t need to participate in… pic.twitter.com/1dP2KtgHvf
— Varun Gandhi (@varungandhi80) January 7, 2021
दरम्यान, अमेरिकेच्या संसदेच्या संयुक्त बैठकीने आज जो बायडेन यांना इलेक्टोरल कॉलेज मतांच्या आधारे विजयी झाल्याचे अधिकृतपणे घोषित केले. रात्री ट्रम्प यांच्या शेकडो समर्थकांनी जोरदार हिंसाचार घडवून आणल्यानंतर संयुक्त बैठकीचे कामकाज काही काळासाठी स्थगित केले गेले होते. मात्र परिस्थिती सुरळीत झाल्यावर बैठकीचे कामकाज पुन्हा सुरू झाले होते.
ट्रम्प यांनी अखेरीस स्वीकारला आपला पराभव
ट्रम्प यांनी संयुक्त बैठकीच्या निर्णयाला स्वीकारल्यासारखे मत व्यक्त केले. संयुक्त बैठकीचा हा निर्णय आपल्या पहिल्या अध्यक्षीय कारकिर्दीचा अखेर असल्याचेच दर्शवते. या निवडणूकांच्या निकालाशी आपण पूर्णपणे असहमत असलो तरी भावी अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याकडे 20 जानेवारी रोजी रितीनुसार सत्ता हस्तांतरित केली जाईल. अमेरिकेला पुन्हा महान बनवण्यासाठीच्या लढ्याची ही सुरुवात असेल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.