नियामे (नायगेर) – पश्चिम आफ्रिकेतील नायजेर प्रजासत्ताकमध्ये दोन गावांवर इस्लामी कट्टरवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये किमान 100 जण ठार झाले आहेत. मालीच्या सीमेजवळच्या टचोंबॅंगौ आणि झारौमदारेये या गावांवर हा हल्ला झाला. पंतप्रधान ब्रिगी राफिनी यांनी या दोन्ही गावांना भेट देऊन तेथील परिस्थितीची पहाणी केली आहे.
स्थानिक नागरिकांनी शनिवारी दोन कट्टरवाद्यांना ठार केल्यावर तिलाबेरी या असुरक्षित भागातील या गावांवर कट्टरवाद्यांनी हल्ला केला, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. नायगेरमधील अध्यक्षीय निवडणुकांचा दुसरा टप्पा लवकरच होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने शनिवारीच केली आहे. त्याच दिवशी हा भीषण हल्ला झाला.
नायजेरियातील बोको हराम, इस्लामिक स्टेट आणि अल कायदाशी संबंधित गटांनी इस्लामी कट्टरवाद्यांनी अलिकडच्या काळात नायजेरमध्ये असे काही हल्ले केले आहेत. नायजेरमध्ये प्रादेशिक आणि आंतरराष्टीय सुरक्षा दले तैनात असूनही अशा हल्ल्यांमध्ये आतापर्यंत शेकडो लोक मारले गेले आहेत आणि हजारो जण विस्थापित झाले आहेत.
जिहादी गटांचा वाढता धोका असतानाही नायजेरमध्ये प्रथमच लोकशाही मार्गाने सत्तेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. नायजेरला 1960 मध्ये फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले आहे.