- अनेक ठिकाणी पावसाची तुरळक हजेरी
- पिकांवर किडीचा प्रादुर्भाव
पिंपरी – गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यातील तापमानात वेगाने बदल होत आहेत. मध्य महाराष्ट्रातील काही भागांत अंशतः ढगाळ हवामान आहे. आज शहरात अभावानेच सूर्यदर्शन झाले. तर शहराच्या काही भागात पावसाने तुरळक हजेरी लावली. यामुळे वातावरणातील उकाडा वाढला आहे. तर पिंपरी-चिंचवड व मावळ पसिरातील पिकांवर काळा मावा व किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. या पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांकडून उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.
अरबी समुद्राचा वायव्य भाग ते उत्तर पंजाब या दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तर गुजरात व राजस्थानच्या नैऋत्य भाग आणि सौराष्ट्र व कच्छ परिसरात चक्रीवादळासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. तसेच राजस्थानच्या नैऋत्य भागात चक्रीय स्थिती असल्याने उत्तर भारतात पावसासाठी पोषक वातावरण झाले आहे. यामुळे उत्तर भारतातील काही राज्यात हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. तर पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच मावळ तालुक्यात सोमवारी (दि.4) तुरळक प्रमाणात हजेरी लावली. ढगाळ वातावरणामुळे मावळातील हरभरा आणि ज्वारीवर किडीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. तसेच काळ्या माव्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. किडीचा प्रादुर्भाव झालेल्या पिकांची पाने पिवळी पडून वाढ खुंटत आहे. त्यामुळे हरभऱ्याचे घाटे पोखरणारी अळी पिक उध्दवस्त करत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
वाढती थंडी फुलोऱ्यातील पिक वाढीला पोषक असते. मात्र, ढगाळ वातावरणामुळे सध्या काळा मावा आणि अळीचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. आणखी काही दिवस असे वातावरण राहिल्यास पिके हातची जाण्याची शक्यता आहे.
– सचिन इंगवले