नांदेड – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील करोना लॅबमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला आहे, असा आरोप विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. सूरज दामरे यांनी केला आहे. तसेच कुलगुरुंच्या वाहनाच्या चॉईस नंबरसाठी हजारो रुपये मोजण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला.
प्रा. सूरज दामरे म्हणाले, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात उभारण्यात आलेल्या कोविड-19 लॅबमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य खरेदी करण्यात आले होते. यासंबंधी आवश्यक असलेले कोटेशन मागवण्यात आले नाही आणि ई-निविदाही काढण्यात आल्या नाहीत. या कामात परस्पर खरेदी करुन लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे.
लॅब उभारणी करण्यासाठी एक कोटी सात लाख 85 हजारचा निधी मंजुर झाला होता. शासकीय आदेशानुसार सदर काम हे ई-निविदा प्रसिद्ध करुन, कार्यारंभ आदेश असे कोणतेही नियम न पाळता हे काम करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
यामध्ये पीपीई किट आणि मास्कचे दर वाढीव लावण्यात आले आहेत. अनेक वेळा त्याच्या दरात तफावत दिसून येत. विशेष बाब खरेदी करण्यात आलेली दुकाने मात्र ठराविकच आहेत, असा आरोप दामरे यांनी केला.