बंगळूर – कर्नाटक सरकारने रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय एक दिवसात मागे घेतला. ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा अवतार आढळल्याने दक्षता म्हणून तो निर्णय घेण्यात आला होता.
मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी बुधवारी संपूर्ण कर्नाटकमध्ये रात्रीची संचारबंदी लागू होणार असल्याचे जाहीर केले. त्यासाठी आधी सांगण्यात आलेल्या तारखांमध्ये आणि वेळेत काही तासांत बदल करण्यात आला.
त्यानुसार, 24 डिसेंबर ते पुढील महिन्याच्या 1 तारखेपर्यंत रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असेल, असे स्पष्ट करण्यात आले. मात्र, संचारबंदीची अंमलबजावणी होण्याच्या काही तास आधी गुरूवारी ती मागे घेण्यात येत असल्याचे येडियुरप्पा यांनी जाहीर केले.
रात्रीच्या संचारबंदीची गरज नसल्याची जनभावना होती. त्याचा विचार करून निर्णयाचा फेरआढावा घेण्यात आला. राज्य मंत्रिमंडळातील सहकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून रात्रीची संचारबंदी मागे घेण्यात येत आहे, असे त्यांनी नमूद केले.
केंद्र सरकारने दिलेला सल्ला ध्यानात घेऊन रात्रीच्या संचारबंदीचे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती कर्नाटक सरकारकडून एक दिवस आधी देण्यात आली होती.