कराड – येथील भाजी मंडईमध्ये जुबेर जहॉंगीर आंबेकरी (वय 30, रा. गुरुवार पेठ, कुरेशी मोहल्ला, कराड) याचा मंगळवारी (दि. 15) रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास तिघांनी धारदार शस्त्राने वार करून आणि फरशी डोक्यात घालून खून केला. या घटनेनंतर संशयित पसार झाले. या प्रकरणी जाबीर जहॉंगीर आंबेकरी यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण आहे. संशयितांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जुबेर व संशयितांमध्ये कराडच्या भाजी मंडईतील रूपसुंदर ज्वेलर्स या दुकानासमोर रस्त्यावर काल (दि. 15) रात्री भांडण झाले. त्यावेळी संशयितांनी जुबेरवर धारदार शस्त्राने वार करून त्याच्या डोक्यात फरशी मारली. त्यामुळे जुबेरच्या डोक्यातून रक्तस्राव झाला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला जुबेर जमिनीवर कोसळल्यावर संशयित पळून गेले. याबाबतची माहिती मिळताच काही लोकांनी जुबेरला रिक्षातून सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात नेले; परंतु उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. मंडई परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. घटनास्थळी रक्त लागलेली फरशी पोलिसांना दिसली. जुबेरवर तिघांनी हल्ला केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.
या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरले असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.