करोना संसर्ग थोपवण्याची आरोग्य विभागाकडून युद्धपातळीवर तयारी
पुणे – शहरात अनलॉकनंतर दिवाळीत खरेदीसाठी झालेल्या गर्दीचे परिणाम पुढील आठ दिवसांत समोर येणार आहे. ऑक़्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून शहरातील करोनाच्या नवीन बाधितांचा आकडा 150 च्या खाली होता. दिवाळीमुळे 1 नोव्हेंबरपासून शहरात दिवाळीच्या खरेदीसाठी विक्रमी गर्दी झाली.
जवळपास 15 ते 18 नोव्हेंबरपर्यंत ही गर्दी कायम असल्याने या गर्दीमुळे करोनाचा कितपत प्रसार झाला, हे पुढील आठ दिवसांत स्पष्ट होईल, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. ही लाट थोपवण्यासाठी तसेच बाधितांची संख्या वाढल्यास जास्तीत जास्त रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी सज्ज राहण्याकरता महापालिकेचा आरोग्य विभाग युद्धपातळीवर तयारी करत आहे.
शहरात 24 नोव्हेंबरपासून करोनाचे नवीन रूग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे. शहरतील एकूण चाचण्यांच्या तुलनेत हा रुग्णवाढीचा दर 9 ते 12 टक्क्याच्या दरम्यान आहे. तर ही संभाव्य रुग्णवाढ लक्षात घेऊन महापालिकेनेही शहरात संशयितांच्या चाचण्यांची संख्या वाढली आहे.
मात्र, 30 नोव्हेंबरपर्यंत चाचण्या वाढवूनही रुग्णांची संख्या नियंत्रित असण्यासोबतच, करोना मृत्यूंची दैनंदिन संख्याही पाचच्या आत स्थिरावल्याचे चित्र आहे. त्यामुळे आरोग्य विभागास दिलासा मिळाला आहे. मात्र, करोनाच्या संक्रमणाचा काळ 10 ते 12 दिवसांचा असल्याने शहरात दिवाळीत झालेल्या गर्दीचा हा संक्रमणाचा कालावधी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंतचा आहे. त्यामुळे, पुढील आठ-दहा दिवसांत नव्याने वाढणाऱ्या रुग्णांच्या आकडेवारीवरून शहरात दुसरी लाट सुरू झाली आहे किंवा नाही, हे स्पष्ट होणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
आरोग्य यंत्रणा सज्ज
केंद्र सरकारने करोनाच्या दुसऱ्या लाटेचा अंदाज दिला असल्याने महापालिका प्रशासनाने आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे. त्या अनुषंगाने लाट आली, तरी दिवसाला 2 हजार रुग्ण दाखल करून घेण्याची सुविधा सज्ज ठेवण्यात आल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. दरम्यान, शहरात सध्या नवीन रुग्ण वाढत असताना, गंभीर रुग्णांचा आकडा अतिशय नगण्य आहे. सुमारे 70 टक्के पेक्षा अधिक रुग्ण हे लक्षणे नसलेले असून, ते घरीच उपचार घेत आहेत. त्यामुळे सर्वसाधारण बेड्स तसेच ऑक्सिजन बेडची उपलब्धताही दुसऱ्या लाटेत भासणार नसणार नसल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.