रेखा जरे खून प्रकरण : सुपारी देऊनच रेखा जरे यांना संपविले

-कोल्हारमधून दोघांना व कोल्हापूर येथून एकास अटक -"मास्टर माईंड' केडगाव परिसरातील असल्याचा संशय

नगर  – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांना सुपारी देऊनच संपविले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. रेखा जरे यांचा खून करणाऱ्या दोघा संशयित आरोपींसह केडगाव परिसरातील आणखी एका संशयितास पोलिसांनी अवघ्या 24 तासांत अटक करण्यात यश मिळविले आहे.

त्यातील दोघांना कोल्हार येथून रात्री उशिरा अटक केली असून, तेथून पसार झालेल्या एका संशयित आरोपीस कोल्हापूर येथून ताब्यात घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले. ताब्यात घेण्यात आलेला तिसरा आरोपी नगरमधील केडगाव परिसरातील असून, तोच या घटनेतील मुख्य सूत्रधार असावा, असा पोलीस पथकाला संशय आहे.

घटनेनंतर दोघाही आरोपींनी दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला होता. हत्येनंतर दोघेही पुण्याच्या दिशेने रवाना झाले होते. तथापि, पुन्हा दिशा बदलून त्यांनी कोल्हार येथे आश्रय घेतला होता, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली. जरे यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने पाच पथके नियुक्‍त केली होती. त्या पथकांनी वेगाने तपास करुन हत्येचा घटनाक्रम उघडकीस आणल्याबद्दल समाधान व्यक्‍त करण्यात येत आहे.

सोमवारी रात्री उशिरा नगर-पुणे रस्त्यावरील जातेगाव घाटात रेखा जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. या घटनेने नगर शहरासह जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रात मोठीच खळबळ उडाली होती. रेखा जरे यांच्या सॅन्टो कारचा कट लागल्याने मोटारसायकवरुन आलेल्या दोघा जणांनी पाठलाग करत जरे यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात येते. तथापि, केवळ कट लागल्याने असा हल्ला होण्याची शक्‍यता नसल्याचा दावा अनेकांनी केला होता. प्रथमदर्शनी हा घातपात असल्याचा संशय समाजमाध्यमांत व्यक्‍त करण्यात येत होता. त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेने तपासाचा वेग वाढविला होता. त्यातूनच घटनाक्रम उलगडत गेल्याचे सूत्रांनी सांगितले.

नगर-पुणे रस्त्यावर जातेगाव घाटात त्यांना दोन हल्लेखोरांनी अडवले होते. त्यावेळी एकाने जरे यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला. त्यात जरे गंभीर जखमी झाल्या व जागीच गतप्राण झाल्या होत्या. घटनेच्यावेळी त्यातील एकाने हल्ला केल्यानंतर मोबाईलवर फोटोही काढल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. त्यामुळे हा पूर्वनियोजित कटाचाच भाग असावा, यास पुष्टी मिळाली होती.

त्यातील मोटरसायकल चालवणाऱ्याने डार्क ब्राऊन रंगाचे लेदर जॅकेट, जीन्स व पायात स्पोर्ट शूज घातलेले होते. त्याला दाढी व मिशी होती. तर दुसऱ्या आरोपीने काळ्या रंगाचा शर्ट, जीन्स व पायात स्पोर्ट शूज घातलेले होते, अशी माहिती रेखा जरे यांच्या आई सिंधुबाई वायकर यांनी पोलिसांना दिली होती. मात्र, घटनेवेळी जरे यांच्या मुलाने आरोपीचा काढलेला फोटो तपासातील प्रमुख दुवा ठरल्याचे सांगितले जाते. तोच फोटो व्हायरला झाल्याने आरोपींपर्यंत पोचण्यास पोलिसांना मदत झाल्याचे सांगितले जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.