कोल्हापूर- महाविकास आघाडी सरकारकडून वाढीव वीजबिल माफ केले जात नसल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रात आज राज्यभर वीजबिल होळी आंदोलन करण्यात आले. याच धर्तीवर भाजपा कोल्हापूरच्यावतीन ताराबाई पार्क इथल्या मुख्य वीज वितरण कार्यालया समोर भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांचे नेतृत्वाखाली विजबिलांची होळी करुन सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. आक्रमक झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी यावेळी रस्त्यावरची वाहने देखील आणण्याचा प्रयत्न केला त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांत शाब्दिक चकमक उडाली. यावेळी कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. महाविकास सरकार आघाडीचा धिक्कार असो, फसवी, खोटी आश्वासने देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, वीजबिले माफ झाली पाहिजेत, भरणार नाही-भरणार नाही वीजबिले भरणार नाही अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. तसेच पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वाढीव वीजबिलांची होळी करून सरकारच्या नावे शिमगा केला.