पुणे – शिवाजीनगर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाजवळ सुरु असलेल्या मेट्रो कामासाठी न्यायालयालगतची काही जागा वापरण्यासाठी घेतली आहे. त्यामुळे न्यायालयात पार्किंगचा प्रश्न उद्भवला आहे. जिल्हा न्यायालयातील नवीन इमारतीसमोरच पक्षकार आणि वकिलांना वाहने पार्क करावी लागत आहेत.
जिल्हा न्यायालयाचे कामकाज सध्या एकाच सत्रामध्ये सुरु असल्यामुळे फारशी गर्दी नाही. मात्र, आता ती वाढत आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत कामकाज एकाच सत्रात सुरु राहणार आहे. मात्र, त्यानंतर पूर्णवेळ सुरु करण्याची मागणी होत आहे. ते झाल्यास वाहनांची गर्दी वाढू शकते, हे लक्षात घेऊन पुणे बार असोसिएशनतर्फे पुढाकार घेऊन न्यायालय परिसरात पार्किंगसाठी पट्टे आखण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये पक्षकार, वकील, न्यायाधीश आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांची वाहने पार्क करण्यासाठी टप्प्याने नियोजन केले आहे. पार्किंगमधील रस्ते सिमेंटचे केले आहेत. मात्र, जागा अपुरी पडत आहे.
मेट्रो स्टेशनच्या कामासाठी न्यायालयालगतची काही जागा वापरण्यात येते आहे. त्यामुळे पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे नवीन इमारतीसमोर वाहने पार्क होत आहेत.