यादीतून आपचे चिन्ह झाले गायब
नगर – आजपासून विधानसभा निवडणुकीची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून दहा राष्ट्रीय व राज्यस्तरावरील राजकीय पक्षांना त्यांचे निवडणूक चिन्ह एबी फॉर्म असलेल्या उमेदवाराला मिळणार आहे. मात्र यातून आप पक्षाचे चिन्ह वगळण्यात आले आहे. अपक्षांना 97 चिन्हांचा पर्याय उपलब्ध आहे.
भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रीय कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन समाज पार्टी, तृणमूल कॉंग्रेस व नॅशनल पिपल्स पार्टी या दहा राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांना त्यांची चिन्हे लागू आहेत. मात्र या यादीतून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पार्टी हा पक्ष वगळण्यात आला आहे. आपचे महाराष्ट्रात अनेक उमेदवार असणार आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने कोणत्या निकषावर आपला वगळले हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. निवडणूक आयोगाचा कुणी अधिकारी यावर भाष्य करत नव्हता.
अपक्ष उमेदवारांना विविध 97 चिन्हे उपलब्ध आहेत. लोकांमध्ये कमी दिवसात पोहचणारे चिन्ह घेण्याचा त्यांचा प्रयत्न राहील असे चित्र आहे. या चिन्हात कपाट, बॅट, कपबशी, टूथब्रश, शिट्टी, हिरवी मिरची, द्राक्षे, सफरचंद, गॅस शेगडी, अंगठी, हेडफोन, लॅपटॉप, किटली, टेबल अशी विविध गृहपयोगी व खाद्यपदार्थ चिन्हे आहेत.