युतीत जागांची अदलाबदलाची शक्यता
शिरूर – शिरूर-हवेली विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे प्रबळ दावेदार असलेले माजी आमदार अशोक पवार यांच्या विरोधात भाजपचे आमदार बाबुराव पाचर्णे लढणार असले तरी शिरूरची जागा भाजपने शिवसेनेला द्यावी, असा आग्रह युतीच्या जागा वाटपात धरला जात आहे.
भाजपशी युती झाली नाहीच तर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ज्ञानेश्वर कटके हे शिवसेनेचे उमेदवार या मतदारसंघातील उमेदवार मानले जात आहेत. शिवसेनेने लोकसभेपासून या मतदारसंघातील तालुक्यात शिवसेनेचे मोठे प्रस्थ निर्माण केले आहे. या तुलनेत भोसरी मतदारसंघ हा शिवसेनेकडे असल्याने तो भाजपने घ्यावा आणि शिरूर शिवसेनेला द्यावा, असा प्रस्ताव पुढे मांडला जात आहे. हडपसर आणि इंदापूरच्या जागेबाबत अदलाबदलीचा विचार होऊ शकतो तर भोसरी आणि शिरूर मतदारसंघ अदलाबदल करण्यात काय हरकत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. शिरूर मतदारसंघ शिवसेनेकडेच येणार, असा विश्वास व्यक्त करीत सेनेकडून या मतदारसंघात आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. या मतदारसंघातून शिवसेनेने आघाडी घेतली आहे.