संयुक्तराष्ट्रे – संयुक्तराष्ट्रांची जगभरात जी कार्यालये आहेत त्यातील एकूण 86 कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे, अशी माहिती आज अधिकृतपणे देण्यात आली आहे. संयुक्तराष्ट्रांचे प्रवक्ते स्टीफन दुजार्रीक यांनी सांगितले की, यातील बहुतांशी कर्मचारी आमच्या युरोपमधील कार्यालयातील आहेत. तथापी अफ्रिका, अशिया, मध्यपुर्व आणि अमेरिकेतील आमच्या कार्यालयातील काही कर्मचारीही करोनाग्रस्त झाले आहेत.
संयुक्तराष्ट्रांच्या कर्मचाऱ्यांना या विषाणुंची बाधा होऊ नये म्हणून आम्ही बहुतेक सर्व कर्मचाऱ्यांना आता वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले आहे. संयुक्तराष्ट्रांच्या मुख्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थितीही लक्षणीयरित्या घटवण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. अदिसअबाबा, व्हीएन्ना येथील सुमारे 99 टक्के कर्मचारी घरातून काम करीत आहेत. करोना आव्हानांचा मुकाबला करण्यासाठीच्या उपाययोजना संयुक्तराष्ट्रांमार्फतही लवकरच हाती घेतल्या जात आहेत, असेही त्यांनी नमूद केले.