वॉशिंग्टन – युद्धग्रस्त गाझामध्ये अमेरिकेच्या विमानांनी आज अन्नाची पाकिटे टाकली. गाझामध्ये निर्माण झालेल्या मानवतावादी संकटाला प्रतिसाद म्हणून अमेरिकेच्यावतीने ही आपक्लालिन मदत आजपासून सुरू करण्यात आली.
इस्रायलने केलेल्या हल्ल्यात मदत मिळण्याच्या प्रतिक्षेत असलेल्यांसुमारे १०० पॅलेस्टिनी ठार झाल्यावर अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी हवा मार्गाने मदत साहित्य पोचवण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेच्या हवाई दलाच्या ३ विमानांनी आज सकाळी गाझामध्ये अन्नाची पाकिटे टाकली. ही मदत ३८ हजार जणांना पुरेल एवढी आहे. ही अन्नाची पाकिटे गाझाच्या नैऋत्येकडील भूमध्य समुद्राच्या किनारपट्टीजवळ टाकण्यात आली.
या मदतीसाठी अमेरिकेला डॉर्डनच्या हवाई दलाच्या विमानांनी मदत केली होती. डॉर्डनच्या विमानांनी देखील शनिवारी उत्तर गाझामध्ये दोन ठिकाणी अन्नाची पाकिटे टाकली होती. गेल्या काही महिन्यात जॉर्डनची विमाने या भागात मदत साहित्य पोचवत आहेत.
अन्नाची ही मदत पुरेशी नाही. अधिक मदत तेथे पोचवण्यासाठी शक्य असलेले सर्व प्रयत्न केले जातील, असे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हटले आहे.
ही एअरड्रॉप मार्गे दिली जाणारी मदत आपत्कालिन असून ट्रकच्या माध्यमातून दिली जाणारी मदत थांबवली जाणार नाही, असे व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा प्रवक्ते जॉन किर्बे यांनी म्हटले आहे.
इस्रायल आणि हमासमधील युद्धाला प्रारंभ झाल्यापासून गाझामधील २.३ दशलक्ष नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे, असे मदत एजन्सीच्या अधिकार् यांनी म्हटले आहे. विमानांद्वारे दिली जाणारी ही मदत देखील पुरेशी नाही असे या अधिकार् यांनी म्हटले आहे.